'माझं पडणं पुणेकरांच्या हिताचं असेल तर मी पडलेलंच बरं...! मी चांदणी चाैक बाेलताेय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 12:37 PM2022-10-02T12:37:52+5:302022-10-02T12:38:15+5:30
महापालिकेच्या दफ्तरी ‘चांदणी चौक’ हे नाव या पुलाजवळ असलेल्या चांदणी बारमुळे प्रचलित झाल्याची नोंद
नम्रता फडणीस
पुणे : कसं व्यक्त होऊ कळत नाहीये. उद्या मी नसणार आहे, याचं दु:ख आहेचं; पण पुणेकरांच्या मी कायमचाच विस्मृतीत जाईन या जाणिवेने मन अधिक गलबलून आलं आहे. पुणेकरांच्या सेवेसाठी मी कायमच तत्पर राहिलो. माझं काही चुकलं असेल तर माफी असावी. आज मनात इतक्या आठवणींनी घर केलं आहे की डोळ्यात अश्रू दाटून आले आहेत. मात्र, माझं पडणं पुणेकरांच्या हिताचं असेल तर मी पडलेलंच बरं! त्याविषयी मनात कोणताच ‘किंतू’ नाही.
मी कसा उभा राहिलो. माझं नाव ‘चांदणी’ हे कसं पडलं? हे बहुतांश पुणेकरांनाच काय मलाही फारसं माहिती नाही. मी काही ऐतिहासिक वगैरे म्हणजे ब्रिटिशकाळात बांधलेला पूल नाही. ‘चांदणी चौक’ हे कोथरूडमधील एक ठिकाण. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्ग, पौड रस्ता आणि एन.डी.ए. कडून पाषाणकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा चौक. याला चौक म्हणत असले तरी येथे चार पेक्षा अधिक रस्ते एकत्र येतात.
बाह्यवळण महामार्गावरून कात्रज, हिंजवडी, निगडी तर पौड रस्त्यावरून पिरंगुट, कोथरूड डेपो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी इथं बसथांबे आहेत. चमचमत्या चांदणीला पाच कोन असतात म्हणून कदाचित मला ‘चांदणी’ हे नाव पडले असावे. हे नाव रूढ केलं ते आयटीमधील तरुणाईने. असं काहीसं कानावर पडलेलं मला आठवतं. माझा असा काही फारसा रंजक इतिहास नसल्याने मी पडलो तरी पुणेकरांना फारसा फरक पडणार नाही; पण माझं अस्तित्वच संपणार असल्याने मीच काहीसा अस्वस्थ नि हळवा झालो आहे.
जुनं जातं आणि नवीन येतं, हा निसर्गाचा नियमच आहे. माझ्या जागी नवीन काहीतरी उभं राहील याचा नक्कीच आनंद आहे. पण, केवळ एकच अंतिम इच्छा आहे की, किमान माझं नाव विस्मृतीत जाऊ देऊ नका. मी तुमच्या आयुष्यात फारसा महत्त्वपूर्ण नसेल कदाचित; पण इतकी वर्षे तुमची सर्व सुख-दु:ख जवळून अनुभवली. अपघातांचाही मी मूक साक्षीदार झालो. प्रत्येक वेळी एखाद्या कुटुंब सदस्याप्रमाणे मीही संकटावेळी तुमच्या पाठीशी उभा राहिलो. मला माहितीये मला पाडतानाचा क्षण असंख्य पुणेकर ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी उपस्थित असतील, त्यांच्या डोळ्यांच्या कडाही नकळतपणे ओल्या होतील. माझ्यासाठीच हेही खूप आहे. पुणेकरांना माझा ‘अलविदा’!
चाैक ‘चांदणी’ की ‘एनडीए’?
महापालिकेच्या दफ्तरी ‘चांदणी चौक’ हे नाव या पुलाजवळ असलेल्या चांदणी बारमुळे प्रचलित झाल्याची नोंद आहे. महापालिकेच्या आताच्या नोंदीत या चौकाचा उल्लेख एनडीए चौक म्हणूनच आढळतो. २०१२-२०१३ मध्ये महापालिकेच्या वतीने ‘एनडीए’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. त्यादिवशीच या चौकाचे नामकरण ‘एनडीए चौक’ म्हणून करण्यात आले आहे. तसा नामकरणाचा फलक या चौकात उभारण्यात आला आहे.