Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या अपघातात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी; बावनकुळेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 03:09 PM2024-09-12T15:09:09+5:302024-09-12T15:09:22+5:30

सुदैवाने या अपघातात कसलीही जिवीतहानी झाली नाही, मात्र तरीही अपघात गंभीर असल्याने त्याची पारदर्शीपणे चौकशी करावी, मी त्यात कसला दबाव वगैरे टाकण्याचा विषयच नाही

If my son is involved in the Nagpur accident he should also be investigated Explanation of the chandrashekhar bawankule | Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या अपघातात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी; बावनकुळेंचे स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या अपघातात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी; बावनकुळेंचे स्पष्टीकरण

पुणे : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीत पूर्ण क्षमतेने एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उमेदवारांमागे असतील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरातील हिट ॲंड रनमध्ये माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी व्हावी, असे पोलिसांना स्पष्टपणे सांगितले आहे, असे ते म्हणाले.

मंगळवारी रात्री बावनकुळे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षाचा प्रचार करणार नाहीत, या टिकेत काही तथ्य नाही. आमचे संघटन पूर्णपणे त्यांच्या उमेदवारांबरोबर असेल. त्यांच्याबरोबरची युती हा केंद्रातील मोदी सरकारला पुढे नेणारी आहे, यावर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वास आहे, त्यामुळे भाजपचा एकही कार्यकर्ता असे करणार नाही. युतीतील प्रत्येकच पक्षाला जास्त जागा हव्यात हे स्वाभाविक आहे, याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल. युतीमागे लाडकी बहीण योजनेची पूर्ण ताकद उभी आहे. विरोधकांना ते समजले आहे. त्यामुळेच ते अशी टीका करत आहे, असे बावनकुळे म्हणाले.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक व्यवस्थापन समितीत त्यांना सदस्य म्हणून जाबाबदारी दिली यावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी असे काहीही नसल्याचे सांगितले. ही समिती वरिष्ठ स्तरावरून झाली आहे. अशा समित्या होतात, त्यावेळी त्यात काही गोष्टी होत असतात. लवकरच याबाबत स्पष्टता आणली जाईल, असे बावनकुळे म्हणाले. भाजपचे पुण्यातील लोकसभा समन्वयक राजेश पांडे, तसेच अन्य अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कसबा, जोगेश्वरी, दगडुशेठ हलवाई, मंडई अशा मानाच्या गणपती मंडळांना भेट देत बावनकुळे यांनी तिथे आरती केली व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.

नागपुरातील हिट ॲंड रन प्रकरणातील वाहन माझ्या मुलाच्या नावावर आहे, हे मीच पोलिसांना सांगितले. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा करावी, अशीच भूमिका घेतली आहे. त्यात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी. सुदैवाने या अपघातात कसलीही जिवीतहानी झालेली नाही, मात्र तरीही अपघात गंभीर होता व त्याची पूर्ण पारदर्शीपणे चौकशी करावी, मी त्यात कसला दबाव वगैरे टाकण्याचा विषयच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: If my son is involved in the Nagpur accident he should also be investigated Explanation of the chandrashekhar bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.