नवीन पिढीला निसर्गाचे बाळकडू दिल्यास भविष्यात निर्सगसेवक तयार होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:38+5:302021-01-23T04:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : निसर्ग मनुष्य प्राण्याच्या रोजच्या जगण्यातील भाग झाला पाहिजे. नवीन पिढीला निसर्गाचे बाळकडू दिल्यास भविष्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निसर्ग मनुष्य प्राण्याच्या रोजच्या जगण्यातील भाग झाला पाहिजे. नवीन पिढीला निसर्गाचे बाळकडू दिल्यास भविष्यात निर्सगसेवक तयार होतील, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केला.
साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि प्रा. विश्वास वसेकर लिखित ‘ऋतु बरवा’ या पर्यावरण विषयक ललित ग्रंथाचे प्रकाशन सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तसेच साधनाचे संपादक विनोद शिरसााठ, उद्धव कानडे, प्राचार्य डाॅ. संभाजी मलघे, कवी संतोष पवार, गिरीश सहस्त्रबुद्धे, जे.पी.देसाई, प्रज्ञा करडखेडकर, श्रावणी वैद्य, सुरेश पाटोळे उपस्थित होते.
आळेकर म्हणाले, निसर्गाप्रती संवेदनशीलता न दाखविल्यास किंवा त्यास गृहीत धरल्यास तो मनुष्य जातीचा समुळ नाश करु शकेल. निरर्गाच्या ताकदीपुढे मनुष्यप्राणी क्षुल्लक आहे.
एम्प्रेस गार्डनचे मानद संचालक सुरेश पिंगळे म्हणाले की, पुण्याचे वैभव आणि मोठा ऐतिहासिक वारसा असलेले एम्प्रेस गार्डनचे अस्तित्व मोठ्या संकटात आले आहे. राजकीय नेत्यांची वक्र दृष्टी या मोठ्या जमिनीवर पडलेली असून तिथे सनदी अधिकाऱ्यांसाठी बंगले बांधण्याचे कारस्थान रचले जात आहे. सर्व निरर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमिंनी एकत्र येऊन या विरुद्ध जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रा मिलिंद जोशी म्हणाले,
जागतिकीरणाच्या नादात आपण देशी अस्सलता विसरत चाललो आहोत. जगात काय घडत आहे, याची खबरबात ठेवताना आपल्याला आपल्या परिसरात असेलेली झाडे-वेलींची नावे देखील माहिती नाहीत. ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे. हे समाजाच्या बाैद्धिक अधोगतीचे लक्षण आहे.
लेखक प्रा. विश्वास वसेकर यांनी झाडे आणि पर्यावरण यांचे नाते स्पष्ट केले. साधनाचे संपादक आणि प्रकाशक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.
फोटो : साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि प्रा. विश्वास वसेकर लिखित 'ऋतु बरवा' या पर्यावरण विषयक ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी (डावीकडून साधनाचे संपादक आणि प्रकाशक विनोद शिरसाठ, लेखक प्रा. विश्वास वसेकर, ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर,प्रा. मिलींद जोशी आणि कवी संतोष पवार.