मोदींच्या नावावर नाही तर, स्थानिक प्रश्नावर निवडणूक लढवा; वंदना चव्हाण यांचे भाजपला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 09:51 AM2023-02-20T09:51:26+5:302023-02-20T09:52:08+5:30
स्मार्ट सिटी, महापालिकेच्या शाळांची दुरवस्था, आरोग्यांच्या सुविधा याकडे भाजपचे दुर्लक्ष
पुणे : कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नावावर लढवत असून, स्थानिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. भाजपने स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवावी, असे आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी दिले आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते मोहन जोशी उपस्थित होते. खा. चव्हाण म्हणाल्या की, भाजपने मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटी आणली तिही राष्ट्रवादीने विकास केलेल्या औंध, बाणेर भागात. भाजपने आणलेली स्वच्छ भारत योजना फसवी ठरली. भाजपने ॲमिनिटी स्पेस भाड्याने देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हाणून पाडला. महापालिकेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. आरोग्यांच्या सुविधा कमी पडत आहे. त्याकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने लक्ष दिले नाही.
नदी सुधार योजना आणली; पण सध्या नदीचा विकास पाहता नदीची वहन क्षमता कमी झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून मेट्रो गेली. मेट्रोच्या दोन्ही बाजूला चार एफएसआय दिला आहे. या मतदारसंघात लोकसंख्या आणि घराची घनता जास्त आहे. त्यात आणखीन एफएसआय वाढविला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरी सुविधांवर ताण पडणार आहे. या सर्व प्रश्नासाठी भाजप उमेदवारांनी काय केले ते जाहीर करावे, असेही चव्हाण म्हणाल्या.