पीएमपीचे प्रवासी घटल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनावर येतेय संक्रांत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 09:00 PM2018-11-19T21:00:48+5:302018-11-19T21:03:12+5:30
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे जमविताना पीएमपी प्रशासनाला दर महिन्याला धावपळ करावी लागत आहे.
पुणे : प्रवासी संख्या कमी झाल्यास पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संक्रांत येत आहे. दिवाळीच्या काळात प्रवासी संख्येत घट झाल्याने पीएमपीला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी, सुमारे साडे तीन हजार कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत. या कर्मचाऱ्यांना निम्मा नोव्हेंबर महिना उलटल्यानंतर वेतन मिळाले आहे. यावरून पीएमपीच्या ढेपाळलेल्या आर्थिक स्थिती वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
पीएमपीला तिकीट विक्री, पास, जाहिरात, दंडाच्या माध्यमातून एकुण खर्चाच्या केवळ ७५ टक्के उत्पन्न मिळते. तर दोन्ही महापालिकांकडून संचलन त्रुटीच्या रुपाने २५ टक्के रक्कम मिळते. त्यातूनच दर महिन्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन करावे लागते. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये केवळ वेतनासाठी ४३८ कोटी रुपये खर्च झाले होते. दरवर्षी या खर्चामध्ये वाढ होत चालली आहे. वेतनासाठी दरमहा ३६ कोटींहून अधिक पैसे लागतात. हा खर्च एकुण खर्चाच्या ५१ टक्के एवढा आहे. त्यातुलनेत पीएमपीला मिळणारे दैनंदिन उत्पन्न कमी आहे. त्यामुळे मागील वर्षी पीएमपीला तब्बल २०४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ही स्थितीत अजून काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे जमविताना प्रशासनाला दर महिन्याला धावपळ करावी लागत आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएमपीतील कायमस्वरूपी सुमारे साडे तीन हजार कर्मचाऱ्यांना १० तारखेला वेतन होणे अपेक्षित होते. दिवाळीनिमित्त काही दिवस आधी त्यांना बोनस मिळाला होता. तर वेतनाचा दिवसही दिवाळीच्या जवळपास असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा होता. पण वेतनासाठी त्यानंतर त्यांना आठ दिवस वाट पाहावी लागली. दि. १७ नोव्हेंबरला प्रशासनाने त्यांचे वेतन केले. त्यासाठी ११ कोटी रुपये जमविण्यात आले. त्याआधी अधिकारी व कंत्राटी कर्मचाºयांचे वेतन मात्र वेळेवर करण्यात आले होते.
---------------
यंदा दिवाळी संपुर्ण आठवडाभर होती. त्यामुळे पुर्ण आठवडाभर पीएमपीला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांºयांचे वेतन लांबल्याची माहिती पीएमपी अधिकाऱ्याने दिली. यापुर्वीही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होण्याचे प्रकार घडले आहेत. अपेक्षित उत्पन्न न मिळणे किंवा एखाद्या खर्चामध्ये वाढ झाल्याने ही परिस्थितीत उद्भवत आहे. त्यामुळे देखभाल-दुरूस्ती, साधन-सामुग्रीच्या खर्चातही कपात करावी लागत असल्याची स्थिती आहे.
------------