पोलिसांनी जर परवानगी नाकारली तर रस्त्यावर घेऊ; पण येत्या ३० जानेवारीला एल्गार परिषद होणारच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 03:52 PM2020-12-31T15:52:12+5:302020-12-31T16:05:12+5:30
निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची घोषणा
पुणे : धर्म, जाती याऐवजी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांवर राजकारण फिरावे, या हेतूने आम्ही काम करत आहोत, हा संदेश देशभर जावा, या उद्देशाने एल्गार परिषद आयोजित केली होती. परंतु, ब्राम्हण्यवाद्यांनी या परिषदेला बदनाम केले. पण, आम्ही मागे हटणार नाही, येत्या ३० जानेवारी रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जर पोलिसांनी परवानगी नाकारली तर आता आम्ही रस्त्यावर ही परिषद घेऊ, असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषदेचे पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आता एल्गार परिषदेच्या नव्या तारखेची पत्रकार परिषदेत घोषणा केली. कोळसे पाटील यांनी सांगितले की, पाकिस्तान, राष्ट्रवाद, लव्ह जिहाद हे आमचे प्रश्न नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांपासून ब्राम्हण्यवादी आणि भांडवलवादी आम्हाला दूर ठेवतात. हे सर्वदूर जावे. तसेच भीमा कोेरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एल्गार परिषदेचे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजन केले होते. या परिषदेचा आणि नक्षलवाद्यांचा काही संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंध जोडण्यात आला. मानवतावादी कार्य करणाऱ्या अनेकांना अटक केली. त्यातील सुधीर ढवळे, शोमा सेन वगळता कोणाचाही एल्गार परिषदेशी संबंध नव्हता. तसेच या परिषदेला नक्षलवाद्यांचा कोणताही पैसा लागला नव्हता. असे असताना वेगवेगळे आरोप करुन एल्गार परिषदेला बदनाम करण्यात आले.
एल्गार परिषदेतून देशभरात संदेश गेला होता. आमची विचाराशी बांधिलकी आहे. त्या हेतूनेच आता ३० जानेवारीला एल्गार परिषद घेत आहोत, असे कोळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी लाल सेनेचे गणपत पिसे, बहुजन एकता परिषदेचे किशोर कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. एल्गार परिषदेला राज्यातील २५० संघटनांचा पाठिंबा आहे. ३० जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि रोहित वेमुला याचा वाढदिवस आहे. त्यादिवशी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत देभरातील मानवतावादी नेते या परिषदेला मार्गदर्शन करतील, असे आकाश साबळे यांनी सांगितले.
बी. जी. कोळसे पाटील यांचे पत्रकार परिषदेतील मुद्दे :
* माझ्याविरुद्ध सर्च वॉरंट घेण्याचा प्रयत्न झाला होता. पण तो यशस्वी झाला नाही. एनआयएसह अनेक संस्थांनी तपासणी केली. त्यांना काही हाती लागले नाही.
* शनिवारवाड्यावर दुसऱ्या दिवशी असलेल्या कार्यक्रमासाठीचा मंच तयार होता. त्यावरच आम्ही एल्गार परिषद घेतली. त्यासाठी एका पैशाचाही खर्च आला नाही.
* ट्रकवर उभे राहून आम्ही सभा घेतल्या आहेत.
* काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षानेच आपल्याला तीन वेळा अटक केली होती.
* एल्गार परिषदेनंतर फडणवीस सरकारने आपल्याला पोलीस संरक्षण दिले होते. महाविकास आघाडीचे सरकार येताच ते संरक्षण काढून घेतले गेले.
* सरकार कोणाचेही आले तरी सर्व सरकारी संस्था मनुवादी विचारांनी ग्रासलेल्या आहेत.