पाण्याचे राजकारण केल्यास त्यांना उघडे पाडू : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 12:14 PM2019-04-10T12:14:12+5:302019-04-10T12:18:55+5:30
पाणी हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर कोणीही राजकारण करु नये..
पुणे : आपल्या भागात पुरेसा पाऊस पडला तर पाण्याचा प्रश्न उरत नाही. यावर्षी १९-२० टक्के कमी पाऊस पडला, याला पालकमंत्री जबाबदार नाहीत. यंदा धरणे भरल्यावर २१ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात आले. मात्र, परतीचा पाऊस व्यवस्थित झाला नाही. पाणी हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर कोणीही राजकारण करु नये. यावर कोणी राजकारण केल्यास आम्ही त्यांना उघडे पाडू, अशा शब्दांत भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी विरोधकांवर निशाणा साधला. येत्या जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यावर पुन्हा पाणी कपात होईल, या प्रचारात देखील तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बापट (दि. ९) यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, शिवसेनेचे प्रशांत बधे आदी यावेळी उपस्थित होते.
‘‘राज्याच्या राजकारणातून दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बापटांना खासदारपदाची उमेदवारी दिली’’, असा आरोप कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘लोकमत’च्याच व्यासपीठावर केला होता. त्याचे खंडन करताना बापट म्हणाले, की इतर काहीच मुद्दे न मिळाल्यास स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे पहायचे वाकून, अशी प्रवृत्ती काहीजणांमध्ये असते. त्यातूनच असे बालिश आरोप केले जातात. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. मी त्यांच्या आधीपासून निवडणूक लढवतो आहे. ज्या पक्षाचे आयुष्य कुरघोडी करण्यात गेले, त्यांनी असे आरोप करणे हास्यास्पद आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीच स्थिती दयनीय झाली असल्याचा दावा बापट यांनी केला. ‘‘कॉंग्रेसला पुण्यात उमेदवार नव्हता. राष्ट्रवादीला मावळात उमेदवार मिळाला नाही. शिरुरमध्ये कॉंग्रेस आघाडीकडे उमेदवार नव्हता. राष्ट्रवादी हा पक्ष तर केवळ पवार कुटुंबापुरता उरला आहे,’’ असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-रिपाई महायुती पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.
बापट म्हणाले, की गेल्या पाच वर्षांच्या काळात यापुर्वी कधी नव्हे इतका निधी राज्य सरकारने पुण्यासाठी दिला. चांदणी चौकातील पुलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९५ कोटी रुपये एका झटक्यात पुणे महानगरपालिकेला दिले. पुणे महापालिका एवढी वर्षे विरोधकांच्या हातात होती. मात्र त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडवला. आता मेट्रोची कामे जलदगतीने होत असल्याचे पुणेकर पाहात आहेत.