वीज तोडल्यास न्यायालयात खटला दाखल करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:22+5:302021-03-16T04:12:22+5:30
-- मंचर : वीज वसुली झाली नाही म्हणून मनमानी पध्दतीने बेकायदेशीररित्या कृषीपंपाची वीज तोडून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी ...
--
मंचर : वीज वसुली झाली नाही म्हणून मनमानी पध्दतीने बेकायदेशीररित्या कृषीपंपाची वीज तोडून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी संकटात आणले तर महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.
वीज वितरण कंपनीला कृषी पंपाची वीज तोडण्यीच सुचना तोडण्याची खुद्द उर्जा मंत्र्याने दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांनी त्याला घाबरून जाऊ नये कारवाईला आलेच त्याचा कायदेशीर प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन प्रभाकर बांगर यांनी केले. सरकारने विज बिल वसुलीसाठी महावितरणला परवानगी देताना शेतकऱ्यांचा विचार करायला हवा होता. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात विज बिल सुद्धा येते. भरमसाठ वीज बिले देऊन शेतकऱ्यांची लूट चालू आहे. महावितरणकडून कुठल्याही प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जात नाही. पदरमोड करून शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. सरकारने सर्वप्रथम सर्व शेतीमालाचा हमीभावाचा कायदा करावा आणि मग वीज बिल वसूल करावे. महावितरणने शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता शेतकऱ्यांच्या शेतात उभे केलेले इलेक्ट्रिक पोल असतील डीपी, वीज वाहतूक करणाऱ्या तारा यांचे भाडे आज तागायत दिले नाही. ते आधी द्यावे. मग वसुलीचा तगादा लावावा. या सर्व बाबी वरून आपल्याला लक्षात येते की आपण सरकारचे किंवा महावितरणचे देणे लागत नाही. उलट आपल्याला महावितरणकडून घेणे आहे.तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपले म्हणणे लेखी व कायदेशीर मार्गाने मांडावे व कृषी पंपाचे वीज बिल भरू नये. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले आहे.