दंडाच्या पावत्या पुणे महानगरपालिकेच्या फाडताय तर मग लॉकडाऊनचे नियम का ग्रामीणचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:57+5:302021-06-03T04:08:57+5:30
उरुळी कांचन: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कारवाई करताना दंडाच्या पावत्या जर पुणे महानगरपालिकेच्या फाडतात, तर मग लॉकडाऊनचे नियम ...
उरुळी कांचन: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कारवाई करताना दंडाच्या पावत्या जर पुणे महानगरपालिकेच्या फाडतात, तर मग लॉकडाऊनचे नियम का ग्रामीणचे लावताय, असा सवाल उरुळी कांचन सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी पोलीस प्रशासनाला केला आहे.
उरुळी कांचनचा पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत २२ मार्च २०२१ पासून शहरात समावेश झाला असल्याने शहरातील कायदे व नियमांचे पालन या ठिकाणी होत आहे. कोविडकाळात शहरातील नियमांनुसार कायदा व्यवस्थेची जबाबदारी पोलीस सांभाळत आहेत. मात्र, दुसरीकडे हा भाग अद्याप जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत नियंत्रणाखाली येथे कामकाज चालत असल्याने प्रशासनातील कामकाजाचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
पुणे महानगरपालिकेचा आणि उरुळी कांचन गावाचा दुरान्वयेही संबंध नाही. मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे पोलीस कारवाई करताना पोलीस विभाग हा दंडात्मक कारवाई करताना पुणे महानगरपालिकेच्या पावतीपुस्तकांचा वापर करीत आहेत. ग्रामपंचायतीकडून वारंवार तोंडी, लेखी तक्रार करूनही पोलीस खात्याकडून याबाबत कोणतीच दाखल घेतली नाही. वरिष्ठ लोकप्रतिनिधीही व जिल्हा प्रशासन याबाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरी पोलीस ग्रामीण जनतेला नाहक त्रास देत आहेत. शेतकरी वर्गावर देखील कारवाई करून पाचशे पाचशे रुपयांच्या पावत्या फाडल्या जात आहेत. लॉकडाऊन व कोरोना संसर्ग याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरीवर्ग, मोलमजुरी करून जगणारा सामान्य माणूस जबरदस्त अडचणीत सापडलेला असताना...खिशात पैसे नसताना... जगण्याची भ्रांत असताना हा पोलिसी खाक्या ग्रामीण जनतेवर अन्याय करत आहे. प्रशासनाकडे याबाबत दाद मागूनही हाती निराशा येत आहे, यावर तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्देश पोलीस खात्याला देणे गरजेचे आहे अशी मागणी सरपंच संतोष कांचन यांनी केलेली आहे.
आम्हाला पुणे शहर आयुक्तालयातून बाहेर काढून पूर्वीसारखेच ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत ठेवावे जेणेकरून ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा व स्थानिक जनतेचा समन्वय चांगल्या पद्धतीने राहून अडचणी सोडवताना त्रास होत नाही असे निवेदन जिल्हाधिकारी पुणे यांना देणार असल्याचे कांचन यांनी सांगितले.
उरुळी कांचन गाव हे शहर पोलिसांशी जोडले गेलेबाबत स्थानिक आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत उरुळी कांचन व परिसर हा ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतच ठेवण्याचा निर्णय झाला होता मात्र, आदेश काढताना अशा पद्धतीने का निघाला हे मलाही सांगता येणार नाही. मात्र, माझा आग्रह उरुळी कांचन व परिसर हा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातच राहण्यासाठी आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे या हद्दीतील व्यावसायिक निर्बंध पोलिसांकडून पाळले जातील. या ठिकाणचा रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १३.८४ टक्के आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील समितीने या ठिकाणचे व्यवहार ग्रामीण भागाप्रमाणे सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्याचे निश्चित केले आहे. शेती व निगडित व्यवसाय कामांना सूट देण्याचे निर्देश आहेत. तर दंडात्मक पावत्यांच्या बाबत माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल
नागेश गायकवाड, पोलीस अधिकारी, पुणे शहर पोलीस गृह शाखा