आरक्षण मिळणार नसेल तर मराठा समाजाला स्पष्ट सांगा; माथी भडकावू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:30+5:302021-08-21T04:15:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “निवडणुकीसाठी जातीचे राजकारण केले जात आहे. निवडणुकीसाठी जात आणली जाईल, पण त्याचे दूरगामी परिणाम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “निवडणुकीसाठी जातीचे राजकारण केले जात आहे. निवडणुकीसाठी जात आणली जाईल, पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याची कल्पना आहे का? मराठा तरुणांचे मोर्चे आज का निघाले? मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा ना. उगाच माथी भडकवण्याचे काम करू नका,” या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ‘तुम कौनसी जात के हो!’ हे महाराष्ट्रातही आणायचे आहे का, असा सवालही त्यांनी केला.
“गेली ७४ वर्षे आपण जातीपातीत खितपत पडलो आहोत. अजूनही रस्ते, वीज पाणी देऊ असे म्हणत असाल तर काय कमावले? जातपात केवळ राज्यात नव्हे तर देशभरात आहे,” असे सांगत ठाकरे यांनी १९९९ च्या पूर्वीही जातीपाती होत्या, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला याचा पुनरुच्चार त्यांनी केला. खरे तर हे सगळ्यांना माहिती आहे, पण बोललो फक्त मी. गेल्या पंधरा वर्षांत शाळा, कॉलेजात, मित्र-मैत्रिणींमध्ये जाती आल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (दि. २०) ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्यावर पंतप्रधान झाले. जात-धर्माच्या नावावर त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. विकासाच्या मुद्यावर देखील मतदान होते. “समाजात जात-धर्माचे वातावरण तयार केले जात आहे. निवडणुकीत वॉर्डनिहाय स्त्री व पुरुष आरक्षण असायला हवे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापालिका निवडणुका आठ महिन्यांवर आल्यामुळे राज ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले असल्याची चर्चा आहे. “मी जेव्हा येत नव्हतो, तेव्हा राज ठाकरे येत नाहीत असे म्हटले जाते. वा रे वा..” अशी मिस्कील टिप्पणी करत माझ्या पुणे दौऱ्याचा महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.