रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यास बिले थांबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:50+5:302021-06-03T04:08:50+5:30
रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रखडलेल्या रस्त्यांसाठी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी ...
रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रखडलेल्या रस्त्यांसाठी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. कामकाजाबाबत नागरिकांनी रस्त्यांच्या कामांवर लक्ष ठेवून कामाचा दर्जा चांगला होत आहे की नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. ठेकेदाराने कामात हलगर्जीपणा करू नये. काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास संबंधित ठेकेदाराची बिले थांबवण्यात येतील, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी दिला आहे.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील मांडव गण फराटा, गणेगाव दुमाला, बाभूळसर आदी गावांच्या रस्त्यांची पाहणी सुजाता पवार यांनी केली. पवार म्हणाल्या की, राज्यात कोरोनाचे संकट सुरू असून सर्वत्र आरोग्य यंत्रणा व इतर कामांसाठी निधी जास्त उपलब्ध होत आहे. त्या मानाने रस्ते विकासासाठी थोड्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. या भागातील अनेक रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली होती. कामकाज निकृष्ट झाल्यामुळे रस्ता खराब असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामे सुरू झाली असून संबंधित ठेकेदाराने या कामात घाई न करता, कामाचा दर्जा राखला पाहिजे. हलगर्जीपणा केल्यास अथवा काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास संबंधित ठेकेदाराची बिले त्वरित थांबविण्यात येतील, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
या वेळी सरपंच शिवाजी कदम, दत्तात्रय फराटे, बाबसाहेब फराटे, सुरेश जगताप, शरद चकोर, सुरेखा जगताप उपस्थित होते.