नियम पाळले नाही, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:22 AM2021-02-21T04:22:35+5:302021-02-21T04:22:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा दाट होऊ लागले आहे. लोकांनी काळजी घ्यायला हवी. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा दाट होऊ लागले आहे. लोकांनी काळजी घ्यायला हवी. अन्यथा, पुन्हा काही कठोर निर्णय नाईलाजाने घ्यावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे एका कार्यक्रमात बोलताना दिला.
बारामती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेध्ये पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोरोना पळून गेल्यासारखे लोक वावरत आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सचे नियम न पाळणे, गर्दीबाबत दिलेल्या नियमांचे पालन न करणे आदी घटना सर्रास घडत आहेत. एकदा कोरोना झाला की पुन्हा होणारच नाही या भ्रमात राहू नका. दोन, तीनदा कोरोना झाल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. जानेवारीपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र नंतरच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याला आळा घालायचा असेल तर सर्वच नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक बनले आहे. यापुढे कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
यावेळी पवार यांनी उपविभागिय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना बारामती मध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या. रविवारी पुण्यात होणाऱ्या बैठकिमध्ये दंडाची रचना ठरवणार आहे. कारवाईची वेळ येऊ देऊ नका. नियमांचे पालन करा. राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. आपली देखील जबाबदारी ओळखा असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
---------------------------