नियम मोडल्यास वाहतूक शाळेत धडे, मॉडेल कॉलनीत ट्रॅफिक पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 04:22 AM2018-04-05T04:22:47+5:302018-04-05T04:22:47+5:30
वाहतुकीचे नियम सातत्याने मोडणाऱ्या वाहनचालकांची पुणे शहरात मोठी संख्या आहे़ त्यांना वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून नियम मोडला जातो, अशांना आता वाहतूक शाळेत जाऊन या नियमांची पुन्हा माहिती करून घेऊन उजळणी करावी लागणार आहे.
पुणे - वाहतुकीचे नियम सातत्याने मोडणाऱ्या वाहनचालकांची पुणे शहरात मोठी संख्या आहे़ त्यांना वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून नियम मोडला जातो, अशांना आता वाहतूक शाळेत जाऊन या नियमांची पुन्हा माहिती करून घेऊन उजळणी करावी लागणार आहे़ मॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिकेत ट्रॅफिक पार्क उभारण्यात आले असून, या ठिकाणी लवकरच अशी शाळा सुरूकरण्यात येणार आहे़
शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि मर्यादित रस्ते यामुळे रस्त्यांवर गर्दीच्या वेळी वाहतूककोंडी ही ठरलेली आहे़ त्यामुळे अनेकांकडून सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे यापासून छोट्या-मोठ्या नियमांचा सातत्याने भंग केला जातो़ अनेकांचा नियम मोडण्याचा उद्देश नसतो; परंतु त्यांना आपण नियम मोडला आहे, याची माहितीच नसते़ अशांसाठी तसेच शालेय मुलांना वाहतूक नियमांची माहिती करून देण्यासाठी चित्तरंजन वाटिकेत ट्रॅफिक पार्क उभारण्यात आले आहे़ याठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे फलक लावण्यात आले आहेत़ सिग्नलही बसविण्यात आले आहेत़ त्यावरून नागरिकांना वाहतूक नियमांची उजळणी करता येऊ शकते़
मॉडेल कॉलनी परिसर सुधार समिती, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी आणि गॅलेंट्री मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने वाहतूक ट्रेनिंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे़ या संस्थेच्या सचिव शामला देसाई यांनी याबाबत सांगितले की, आमच्या भागातील दीप बंगला चौकात होणाºया वाहतूककोंडीतून आमचे या समस्येकडे लक्ष गेले़ नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीच्या वतीने २ ते ९ आॅक्टोबर दरम्यान आम्ही शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविली़ त्यात काही पोलीस चौक्यांमध्येही साफसफाई करण्यात आली़ चित्तरंजन वाटिकेमध्ये महापालिकेच्या सहकार्याने ट्रॅफिक पार्क उभारण्यात आले आहे़ याच ठिकाणी ट्रेनिंग सेंटरही आहे़ आम्ही जेव्हा लोकांची चर्चा केली, तेव्हा अनेकांनी आपण एजंटामार्फत वाहनचालक परवाना मिळविल्याचे सांगितले़
कशी असेल ही शाळा?
वाहतूक नियमांची माहिती करून घेण्यासाठी या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत़ येथे येणाºया लोकांनी त्याची माहिती घ्यावी़ वाहतूक पोलिसांकडे अपघात कशामुळे घडले, का घडले याची माहिती देणाºया अनेक छोट्या छोट्या फिल्म आहेत़ येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये लोकांना साधारण अर्धा तास या फिल्म दाखविण्यात येतील़ त्यानंतर त्यांना एक प्रश्नपत्रिका दिली जाईल़ त्याची त्यांनी त्यावर उत्तरे द्यायची आहेत़ त्यातून त्यांना काय समजले हे लक्षात येईल़
या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी ‘यापुढे मी वाहतूक नियमांचे पालन करेऩ नियमभंग करणार नाही़’ अशी शेवटी एक प्रतिज्ञा असेल़
लोकांनी नियमांची माहिती करून घेऊन आपल्या वाहन चालविण्यात त्यानुसार बदल करावा़ त्यामुळे सध्या पुणेकर वाहतूक नियमभंग केल्याने जो कोट्यवधींचा दंड भरतात़, तो त्यांना भरावा लागू नये व यातून वाहतूक शिस्त वाढावी असा प्रयत्न आहे़
यासाठी वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य असणार असून, येथे येणाºया लोकांना ते नियम समजावून सांगून फिल्म दाखवणार आहेत़
सुरुवातीला रोटरी, लायन्स क्लबच्या सहकार्याने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे़ शाळांतील मुलांनी याची माहिती करुन घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत़
लोकांना नियमांची माहिती नसल्याने ते मोठ्या वाहनांना डाव्या बाजूने ओव्हरटेक करतात, त्यातून अपघात घडल्याचे अनेकदा दिसून आले आहे़ कोणालाही विनाकारण नियम मोडायचे नसतात; पण माहितीच नसल्याने अनेकांकडून नियमभंग केला जातो़ अशासाठी आपण ट्रेनिंग सुरू करावे, असा विचार आम्ही सुरू केला़ त्याला पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तत्काळ प्रतिसाद दिला़ एक नाही तर शहराच्या चारीही बाजूंना असे सेंटर सुरू करण्याची सूचना केली़
कायद्यातील
तरतूद पाहून निर्णय
वाहतूक नियमांची माहिती करून देऊन वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचा हा उपक्रम चांगला आहे़ वाहतूक नियमांचे भंग करणाºया वाहनचालकांना या ठिकाणी जाऊन नियमांची माहिती घेणे बंधनकारक करता येईल का? याविषयी कायद्यातील तरतुदी पाहून निर्णय घेणार आहे़ वाहनचालकांना नियमांची पुरेशी माहिती नसल्यानेच त्यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर भंग केला जातो, हेही तितकेच खरे आहे़
अशोक मोराळे,
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
कोणालाही शिक्षा अथवा दंड झालेला आवडत नाही़ नियमांची पुरेशी माहिती नसल्याने दंड होऊ नये, यासाठी आम्ही हे ट्रेनिंग सेंटर सुरू करीत आहोत़ ही शाळा कोणालाही शिक्षा वाटू नये, तर त्यामुळे वाहन चालविताना स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घेतली जावी, हा उद्देश आहे़
- श्यामला देसाई