पगार वेळेत न झाल्यास खातेप्रमुखांवरच खापर फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:20+5:302021-01-08T04:34:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंत्राटी कामगारांना ठेकेदारांकडून वेळेत पगार दिले जात नाही़ या पार्श्वभूमीवर खासगी ठेकेदाराकडून यापुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कंत्राटी कामगारांना ठेकेदारांकडून वेळेत पगार दिले जात नाही़ या पार्श्वभूमीवर खासगी ठेकेदाराकडून यापुढे पगार देण्यात अनियमितता झाल्यास आता थेट महापालिकेच्या संबंधित खातेप्रमुखाला जबाबदार धरले जाणार आहे़ कंत्राटी कामगारांचे पगार वेळेत न झाल्यास त्याचे खापर महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार खातेप्रमुखांवरच फुटणार आहे़ महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणच्या कामांसाठी खासगी ठेकेदारांची नियुक्ती केली गेली आहे़ या ठेकेदारांनामार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करून त्यांच्याकडून काम करून घेतले जाते़ कोरोना आपत्तीच्या काळात या कंत्राटी कामगारांनीही जीवाची पर्वा न करता अविरत काम केले़ पण या कामगारांना कधीच महिन्याच्या ७ तारखेला विहित पगार दिला जात नाही़ याबाबत महाराष्ट्र कामगार मंच यांच्याकडून महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती़
कंत्राटी कामगार अधिनियम १९७० अन्वये कंत्राटी कामगारांचा पगार महिन्याच्या ७ तारखेला होणे बंधनकारक आहे, असे असतानासुध्दा कंत्राटी कामगारांना वेळेत पगार दिले जात नसल्याबाबत महापालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे़ या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी महापालिकेच्या सर्व खातेप्रमुख / विभागप्रमुख यांना पत्र पाठवून सर्व कंत्राटी कामगारांना विहित पगार वेळेत ठेकेदारांकडून दिला जातो आहे का नाही याची खातरजमा करण्यास सांगितले आहे़ तसेच यापुढे कंत्राटी कामगारांना वेळेत पगार न मिळाल्यास त्यांस थेट खातेप्रमुख व विभागप्रमुखांनाच जबाबदार धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे़
----------------------------------------------
महापालिका सेवेत साडेसात हजार कंत्राटी कामगार
महापालिकेच्या विविध खात्यांतर्गत शहरात खासगी ठेकेदारांमार्फत सुरू असलेल्या कामांवर तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये, नागरी सुविधा केंद्रात व अन्य ठिकाणी ७ हजार ५०० कंत्राटी कामगार आहेत़
कंत्राटी कामगारांना वेळेत पगार मिळावा याकरिता महापालिका वरिष्ठांनीच आता लक्ष घातल्याने, प्रत्येक ठेकेदाराला कंत्राटी कामगार अधिनियम १९७० अन्वये महिन्याच्या ७ तारखेलाच आपल्या कामगारांना पगार द्यावा लागणार आहे़
--------------------------------------