राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांना बळीचा बकरा करू नये : रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 04:03 PM2021-07-16T16:03:12+5:302021-07-16T16:08:18+5:30
राष्ट्रपती पदाचे उमेदवार शरद पवार असतील तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे धोकेबाज नेते नाहीत. ते देशाचे नेते आहेत. राष्ट्रपती पदाचे उमेदवार पवार असतील तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नये असे वक्तव्य केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
पुणे दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. आठवले म्हणाले, ओबीसी समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्याने जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे हर नेमकेपणाने ठरविता येईल. ओबीसींचा डेटा अंदाजे तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्र तो देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आठवले म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे सत्तास्थानी आलेल्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये ताळमेळ नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे. विधानसभा अध्यक्षांची निवडणुक आमदार फुटतील या भीतीने पुढे ढकलण्यात येत आहेत.
मराठा आरक्षणाचे अधिकार राज्याला देण्यासाठी संसदेने ठराव पारीत करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. ईडी कारवाईशी केंद्र सरकारचा काही संबंध नसल्याचे आठवले म्हणाले.