असेल ‘सिग्नल’ लाल तर रेल्वेला लागणार आपोआप ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:07+5:302021-06-19T04:08:07+5:30
प्रसाद कानडे पुणे : रेल्वे चालकाला आता सिग्नलसाठी स्पॉट सिग्नलकडे बघण्याची गरज नाही. कारण ड्रायव्हर केबिनमध्येच आता पुढचा सिग्नल ...
प्रसाद कानडे
पुणे : रेल्वे चालकाला आता सिग्नलसाठी स्पॉट सिग्नलकडे बघण्याची गरज नाही. कारण ड्रायव्हर केबिनमध्येच आता पुढचा सिग्नल कोणता ते समजणार आहे. रेल्वेच्या संशोधन आणि विकास विभागाने (आरडीएसओ) सिग्नल दाखवणारे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण ब्रेकिंग सिस्टीमशी जोडले असल्याने लाल सिग्नल असेल तर गाडीला ऑटोमॅटिक ब्रेक लागून गाडी थांबेल. या ‘स्पेक्ट्रम’ प्रणालीमुळे रेल्वे गाड्यांची समोरासमोर धडक होण्याचा धोका टळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-चेन्नई मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.
भारतीय रेल्वे येणाऱ्या पाच वर्षांत सिग्नल यंत्रणेवर जवळपास साठ हजार कोटी रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा अद्ययावत करणार आहे. यासाठी ५ मेगाहर्टझ स्पेक्ट्रम रेल्वेला मिळणार आहे. याचा वापर रेल्वेची गती टिकवणे आणि सुरक्षा वाढवणे यासाठी होणार आहे. स्पेक्ट्रममुळे रेल्वेत ‘हाय स्पीड कम्युनिकेशन’ सुधारेल. शिवाय ही सर्व यंत्रणा जीपीएस आधारीत असणार आहे. त्यामुळे रेल्वेची अचूक माहिती मिळणे सोपे होईल.
चौकट
मुंबई-चेन्नई मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा समावेश
“या नव्या प्रणालीसाठी देशातील चार प्रमुख रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला. त्यात ‘मुंबई-चेन्नई व्हाया पुणे’ हा मार्गदेखील आहे. या मार्गावरून धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या इंजिनमध्ये हे उपकरण बसविण्यात येणार आहे. यात ईएमडी व अल्को अशा दोन्ही प्रकारच्या इंजिनचा समावेश आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत हे उपकरण बसविले जाईल.
चौकट
याचा फायदा काय?
मुसळधार पावसात किंवा हिवाळ्यात दाट धुक्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागतात. गाड्यांचा वेग कमी करून रेल्वे वाहतूक करावी लागते. उत्तर भारतात याचा परिणाम जास्त दिसतो. नव्या प्रणालीमुळे पावसात व धुक्यात बाहेरचा सिग्नल बघायची गरज नाही. चालकाला पाच किमी आधी पुढचा सिग्नल केबिनमध्येच दिसेल. त्यामुळे गाड्या रद्द कराव्या लागणार नाहीत.
चौकट
सुरक्षेला महत्त्व
“स्पेक्ट्रममुळे भारतीय रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत अभूतपूर्व बदल होणार आहे. याचा फायदा प्रवासी सुरक्षेसाठी देखील होईल. सध्या जवळपास ३ हजार डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले. डब्यांत जर काही अनुचित घडत असेल तर त्याचे दृष्य तत्काळ चालकाच्या स्क्रीनवर दिसेल.” -
संजीव मित्तल, पायाभूत सुविधा सदस्य, रेल्वे बोर्ड.