Supriya Sule:...जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:21 PM2022-04-18T13:21:07+5:302022-04-18T13:21:24+5:30
महाराष्ट्राची बदनामी करणे तुम्हाला शोभत नाही
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुढीपाडवा आणि ठाण्यातील सभेत त्यांनी भोंग्यावर विशेष लक्षकेंद्रित केले आहे. ठाण्यातील सभेत राज यांनी मशिदीवरचे भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा देशभरात हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत मुस्लिम बांधवानी भोंग्यांबाबत आमचे ऐकावे अन्यथा हनुमान चालीसा लावली जाईल. अशी आक्रमक भूमिका कालही राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्शवभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
''महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही असं त्या म्हणाल्या आहेत. पुण्यातील इंदापूरात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.''
सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारचा डेटा सांगतो की, नवीन उद्योगांच्या उभारणीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणे तुम्हाला शोभत नाही असं त्या राज ठाकरेंना नाव न घेता बोलल्या आहेत.
महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही
बाळासाहेब ठाकरे आणि मराठीवर खरंच प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा. महाराष्ट्राची बदनामी करू नका. तुम्हाला जे भाषण करायचे ते करा पण आम्हाला कामे द्या. भाषण करून दोघांच्या आयुष्यात अजिबात फरक पडणार नाही. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही,'' अशा शब्दात सुळेंनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे.