महिलांना जागा न दिल्यास बस आता थेट पाेलीस चाैकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 02:21 PM2019-11-04T14:21:43+5:302019-11-04T14:23:30+5:30
महिलांसाठी राखीव जागेवर बसलेल्या पुरुषाने महिलेला जागा न दिल्यास बस थेट पाेलीस चाैकीत घेऊन जाण्याचे आदेश पीएमपी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पुणे : पीएमपीमधील महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व सुरक्षित व्हावा या दृष्टीने पीएमपीएमएलच्या बसमधील डावी बाजू ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. राखीव जागेवर बसलेल्या पुरुषाने जर महिलेला जागा देण्यास नकार दिल्यास बस आता थेट पाेलीस चाैकीमध्ये घेऊन जाण्याचे आदेश पीएमपी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पीएमपीएमएलमधील डावी बाजू ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा यासाठी हे प्रयाेजन करण्यात आले आहे. अनेकदा महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर पुरुष बसलेले असतात. महिलेने जागेची मागणी केल्यास ती माेकळी करुन देणे अपेक्षित आहे. परंतु अनेकदा पुरुष जागा देण्यास नकार देतात. त्यामुळे वादाचे प्रसंग देखील घडतात. त्यामुळे आता महिलांना जागा मिळवून देण्यासाठी पीएमपी कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करण्यास कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. तरीही पुरुषाने जागा न दिल्यास पीएमपी कर्मचाऱ्यांनी बस थेट नजिकच्या पाेलीस चाैकीमध्ये घेऊन जावी असे आदेश वाहतूक व्यवस्थापकांकडून देण्यात आले आहेत.
तसेच कारवाईसाठी बस चाैकीस नेल्याबाबत मेसेज संबंधीत कर्मचाऱ्याने पीएमपीच्या अपघात विभागास देण्यासंदर्भातही सांगण्यात आले आहे. या सूचनांचे उल्ल्ंघन केल्यास कर्मचाऱ्यांविराेधात प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.