थकबाकी न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित करू; शासकीय कार्यालयांना पाणीपट्टी भरण्याचे अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 09:48 AM2023-12-27T09:48:54+5:302023-12-27T09:49:08+5:30
शहरात सरकारी कार्यालयांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होण्याची शक्यता नसल्याने या संस्थांकडून पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते
पुणे : शहरात केंद्र व राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत. रेल्वेसह पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट आहे. या सर्वांना महापालिका पाणीपुरवठा करते. या सर्व विभागांकडे मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी थकीत आहे. ती वसूल करण्यासाठी महापालिकेने संबंधित संस्थांना नोटीस पाठविणार आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत थकबाकी न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित करू, असा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.
शहरात सरकारी, निमसरकारी कार्यालये आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होण्याची शक्यता नसल्याने या संस्थांकडून पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. महापालिका प्रशासनाने मागील वर्षी शासकीय संस्थांकडील थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. मात्र, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
पुणे कॅन्टोन्मेंटकडे थकले ४० कोटी
पाणीपट्टीचे ४० कोटी रुपये पुणे कॅन्टोन्मेंटकडे थकले आहेत. मागील वर्षी कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यादिवशी कॅन्टोन्मेंटने तातडीने दोन कोटी रुपयांची थकबाकी भरली. त्यानंतर थकबाकी भरण्याकडे पुन्हा डोळेझाक केले आहे. अशीच परिस्थिती अन्य संस्थांबाबत असल्याने वसुली मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे.
पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या माध्यमांतून देवाची उरूळी, फुरसुंगी आणि मंतरवाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना केली आहे. यासाठी महापालिकेनेही निधी उपलब्ध करून दिला. या योजनेतील पाइपलाइन, साठवण टाकी आणि जलकेंद्राचे काम झाले असले तरी रेल्वे लाइन ओलांडून टाकाव्या लागणाऱ्या मुख्य वाहिनीच्या कामाला परवानगी मिळत नसल्याने काम रखडले होते. रेल्वेने परवानगी दिल्यानंतर हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. तसेच फुरसुंगी परिसरासाठी मुठा उजवा कालव्यातून पाणी उचलण्यात येते. यासाठी कालव्यात पाणी सोडावे लागते. यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर जलकेंद्रातून थेट पाइपलाइन करून फुरसुंगीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीच्या पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्याभरात जलकेंद्रावर पंप बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर देवाची उरूळी, फुरसुंगी व मंतरवाडीला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
सरकारी संस्थांकडून पाणीपट्टी भरली जात नाही. त्यांना आता नोटीस बजावली जाईल, त्यानंतरही थकबाकीचे पैसे भरले नाहीत, तर ३१ जानेवारीनंतर पाणीपुरवठा बंद केला जाईल. - विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका