बसपा चे सरकार न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ - मायावतींचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 06:14 PM2024-11-17T18:14:07+5:302024-11-17T18:19:20+5:30
जातीवाद, भांडवलशाही विचारांमुळे बहुजन समाजाच्या स्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही, म्हणून या पक्षांना मतदान करून अपमानित होऊ नका
पुणे : पक्षाला सरकार स्थापन करायचे मात्र न झाल्यास तारतम्य ठेवत आगामी सरकार बनवणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असे आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी पुण्यात बोलताना दिले आहे. वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांच्या प्रचारार्थ येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मैदानात आज सभा पार पडली यावेळी त्या बोलत होत्या.
बहुजन समाज पक्षाने मागील चार टर्ममध्ये तळागाळातील समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. प्रत्येक व्यक्तिला नोकरीची शाश्वती ,पक्के घरे आणि अनेक योजनांचा लाभ दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी 'बसपा'च्या माध्यमातून विधीमंडळात पोहोचवायला हवा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच यावेळी त्यांनी निवडणूक स्वबळावर का लढवण्याचा निर्णय घेतला यावरही भाष्य केले. बसपने कायम अनेक पक्षांना पाठिंबा दिला आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा इतर पक्षांसोबत मिळून बसप ने निवडणूक लढवली तेव्हा तेव्हा दलितांचे मत सोबत असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला गेली. परंतु जातीवादी मानसिकतेमुळे त्यांच्या पक्षाचे बहुतांश मत आमच्या पक्षाला मिळत नाही. त्यांची मत अंतर्गत रित्या दुसऱ्या उमेदवाराला जातात. त्यामुळे यंदा लोकसभेसह विधानसभा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण मायावती यांनी दिले.
उत्तरप्रदेश राज्यात आतापर्यंत कॉंग्रेस, भाजप तसेच इतर पक्षांचे 'गठबंधन' सरकार राहिले आहे. मात्र जातीवाद, भांडवलशाही विचारांमुळे दलित, आदिवासी,अल्पसंख्यांक, मुस्लिम आणि ओबीसींच्या स्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही. त्याचप्रमामाणे बेरोजगार, शेतकरी, मजूरांची स्थिती हलाखीची आहे. म्हणून या पक्षांना मतदान करून अपमानित होऊ नका. डॉ. बाबासाहेबांनी या वर्गांच्या उन्नतीसाठी संविधानात कायदेशीर अधिकार दिले असल्याचे देखील मायावती यांनी मत व्यक्त केले.