उमेदवारी मान्य असेल तर राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा लढवू- शिवाजीराव आढळराव-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:58 PM2024-03-01T12:58:08+5:302024-03-01T12:58:51+5:30
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे काही गैरसमज असतील तर ते एकत्रित बसून मिटवू, असे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले...
मंचर (पुणे) : शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन माझ्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. राष्ट्रवादीला मी उमेदवार म्हणून मान्य असेल तर राष्ट्रवादीकडून शिरूरची निवडणूक लढवू. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे काही गैरसमज असतील तर ते एकत्रित बसून मिटवू, असे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असून, शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक लांडेवाडी येथे आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. कार्यकर्त्यांची मते त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, सध्या राज्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन उमेदवारी घेणार आहे. प्रदीप कंद राष्ट्रवादीत येऊन उमेदवारी घेतील, पार्थ पवार येथून लढणार आहे. अशा चर्चा होत आहेत. या परिस्थितीत सहकाऱ्यांच्या मनात संभ्रम होऊ नये यासाठी आजची बैठक घेतली आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी मला बैठकीसाठी बोलवले होते. त्यावेळी अद्याप शिरूरचे जागावाटप झालेले नाही. ही जागा कुणाला जाणार हे ठरलेले नाही. शिरूरची वाटणी झाली नाही. मात्र पाच दिवसात जागावाटपाचा निर्णय होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
आढळराव पाटील पुढे म्हणाले, अपक्ष निवडणूक लढता येणार नाही. ही जागा कोणत्याही पक्षाला जाऊ शकते. त्यामुळे लगेच काही सांगता येणार नाही. उद्या जागा शिवसेनेलाही मिळू शकेल किंवा राष्ट्रवादीलाही जाईल. आमदार दिलीप मोहिते यांच्याशी तुमचे जमत नाही हा प्रश्न विचारला असता आढळराव पाटील म्हणाले, मोहिते व माझ्यामध्ये वैयक्तिक पातळीवर प्रश्न आहेत. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार निवडून देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वैयक्तिक वाद महत्त्वाचा राहत नाही. मी मोहिते यांच्या संपर्कात कायमच असतो. त्यांच्याशी मी कधीच राजकारण केले नाही. काही गैरसमज असतील तर ते बसून मिटवू, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य
उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, त्यावेळी शिरूरबाबत चर्चा झाली आहे. शिरूरवर दावा करत हा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा आहे. येथील सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असून, सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर प्रबळ दावा करणार आहे, असे सांगून आढळराव पाटील म्हणाले शिरूर लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे. ही जागा शिवसेनेला मिळाली तर मीच उमेदवार असणार आहे. मागील पाच वर्षे मी मतदारसंघात संपर्क ठेवला असून, मोठा निधी आणला आहे. मात्र शिरूरची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेसला गेली तर उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय तो पक्ष घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय सांगतील तो आम्हाला मान्य असणार आहे. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याने पाच वर्ष शिरूर मतदारसंघ मागे गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला व राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मान्य असेल तर शिरूरची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली जाईल.