मंत्रालयातून विनंती करुनही जर रुग्णालय ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:03 IST2025-04-04T11:03:17+5:302025-04-04T11:03:37+5:30
तातडीचे उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना केवळ पैशांसाठी सेवा नाकारण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी निश्चित दिशानिर्देश राज्यातील रुग्णांना द्यावेत

मंत्रालयातून विनंती करुनही जर रुग्णालय ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? सुप्रिया सुळेंचा सवाल
पुणे: पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाबाबत संताप व्यक्त केला जातोय. खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलेच्या मृत्यूची घटना अतिशय गंभीर बाब असल्याचे सांगत सवाल उपस्थित केला आहे. मंत्रालयातून विनंती करुनही जर रुग्णालय प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सखोल चौकशीची मागणीही केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे शहरातील रुग्णालयांत अद्ययावत सुविधा आहेत. परंतु जर पैशाअभावी त्या नाकारल्या जात असतील ही अतिशय गंभीर बाब आहे. पुण्यात एका नामांकित रुग्णालयाने एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेला प्रचंड रक्तस्त्राव होत असतानाही केवळ पैशांअभावी उपचार नाकारल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. अगदी मंत्रालयातून फोन गेल्यानंतर देखील त्या महिलेवर वेळेत उपचार झाले नाहीत. ही महिला काही तास रुग्णालयाच्या दारात वेदनेने विव्हळत होती. पण मानवतेच्या भूमिकेतून देखील रुग्णालय प्रशासनाने विचार केला नाही. अखेर त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. प्रसुतीदरम्यान एकाही मातेचा मृत्यु होऊ नये असे आरोग्यसेवेचे धोरण असायला हवे. पण अगदी मंत्रालयातून विनंती करुनही जर रुग्णालय प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन सखोल चौकशी करावी. याखेरीज तातडीचे उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना केवळ पैशांसाठी सेवा नाकारण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी निश्चित दिशानिर्देश राज्यातील सर्व रुग्णालयांना द्यावेत.
पुणे शहरातील रुग्णालयांत अद्ययावत सुविधा आहेत. परंतु जर पैशाअभावी त्या नाकारल्या जात असतील ही अतिशय गंभीर बाब आहे. पुण्यात एका नामांकित रुग्णालयाने एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेला प्रचंड रक्तस्त्राव होत असतानाही केवळ पैशांअभावी उपचार नाकारल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला… https://t.co/BmsOuSWAvf
— Supriya Sule (@supriya_sule) April 3, 2025
शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.