पक्षाने जर मला उमेदवारी दिली नाही, तर मला जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल - अमोल बालवडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:10 PM2024-10-07T15:10:01+5:302024-10-07T15:10:32+5:30
मी कोथरूड मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे समजताच त्यांनी मला धमकी दिली
पुणे: विधानसभेच्या रणधुमाळीला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूडविधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. अशातच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्याचे समोर आले आहे. बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला होता.
मी कोथरूड मतदार संघातून इच्छुक असल्याने चंद्रकांतदादा माझ्यावर नाराज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. कोथरूड मतदार संघातून इच्छुक असल्याने मला आमच्या पक्षातील काही लोकांनी बहिष्कृत केल्याचा आरोपही बालवडकर यांनी केला होता. आता दिवाळीनिमित्त सरंजाम वाटप कार्यक्रमातून बालवडकर यांनी मतदारसंघात दंड थाेपटत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
ज्या नेत्यासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये प्रामाणिक काम केले, त्याच नेत्याने मी आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहे असे समजताच आपल्याला धमकी दिली. एखाद्या कार्यकर्त्याने आमदार होण्याची इच्छा व्यक्त करणे हा गुन्हा आहे काय? असा सवाल व्यक्त करत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी रविवारी (दि. ६) जनआशीर्वाद मेळावा आणि दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम घेण्यात आला. बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर हजाराे नागरिक उपस्थित हाेते. दिवाळीनिमित्त सरंजाम वाटप करण्यात आले. पक्षाने माझा विचार करावा. मी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड मतदारसंघातून इच्छुक असून, पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.