अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 09:38 AM2024-02-28T09:38:27+5:302024-02-28T09:39:08+5:30
महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले....
पुणे : निवडणूक कुणाला सत्तेवर बसवण्यासाठी नसून नागरिकांचे अधिकार शाबूत ठेवण्यासाठी असते. सध्याच्या सरकारकडून संविधानाची चौकट मोडली जात असून लोकांना बंदिस्त केले जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लोकशाही, संविधानाला धोका आहे. त्यामुळे आता महात्मा फुले, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या मतदारांनी एकत्रित येण्याची गरज असून मुस्लिमांनाही सोबत घ्यावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आयोजित सत्ता परिवर्तन सभेत केले. महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले.
आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दंगली घडविल्या जाण्याची शक्यता आहे. सरकार ज्या पद्धतीने दडपशाहीचे काम करत आहे त्याला घाबरून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. असेच दडपशाहीचे राजकारण सुरू राहिले तर लोकशाही टिकेल का, संविधान टिकेल का, असा प्रश्न उपस्थित करत हेच सरकार पुन्हा निवडून दिल्यास बंदिस्त लोकशाही येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे, मुन्नवर कुरेशी आदी उपस्थित होते.
जरांगे यांना निवडणूक लढविण्याचा सल्ला
सध्याच्या राज्य सरकारने ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण केला आहे. ओबीसींचे ताट वेगळे असावे व गरीब मराठ्यांचे ताट वेगळे असावे, अशी वंचितची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे त्यासाठीच लढाई लढत असून त्यांनी आता हिंमत करून निवडणूक लढवावी, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.