काम अपुरे मग उदघाटन का? संचालक म्हणाले, मेट्रो तातडीने सुरु व्हावी अशी पुणेकरांची मागणी
By राजू इनामदार | Published: September 25, 2024 06:56 PM2024-09-25T18:56:53+5:302024-09-25T18:57:27+5:30
स्थानकापर्यंत नेणाऱ्या काही पुलांची कामे अपुरी असून येत्या २ महिन्यांत ती पूर्ण होतील
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. २६) पुणे दाैऱ्यावर असून, ते मेट्रोने प्रवास करणार आहेत. मात्र, या कालावधीत प्रवाशांसाठी मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे. स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन यासह मोदी यांच्या हस्ते वेगवेगळ्या खात्यांच्या १२ प्रकल्पांची सुरुवात होणार आहे.
जिल्हा न्यायालयाजवळच्या कार्यालयात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली. अन्य खात्यांचे प्रमुख अधिकारीही यावेळी उपस्थित होते. हर्डीकर म्हणाले, ‘महामेट्रोचा वनाज ते रामवाडी हा मार्ग पूर्ण झाला आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील स्वारगेट ते मंडई या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण आता होत आहे. त्याचबरोबर महामेट्रो स्वारगेट ते कात्रज या साधारण ६ किमी भुयारी मार्गाचे कामही सुरू करत आहे. ३ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. सुरू झाल्यानंतर साडेचार वर्षांत तो पूर्ण होणार आहे. या मार्गावरील दररोज होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या भुयारी मेट्रो मार्गाची मोठी मदत होणार आहे.’
मेट्रो तातडीने सुरू व्हावी अशी पुणेकरांची मागणी
महामेट्रोच्या या प्रकल्पाला मुदतीपेक्षा जास्त वेळ लागला असून, काम अजूनही अपुरेच आहे, तरीही उद्घाटनाची घाई केली जाते. याबाबत विचारले असता हर्डीकर म्हणाले, ‘मेट्रो तातडीने सुरू व्हावी अशी पुणेकरांची मागणी होती. त्यामुळे आम्ही एकूण मार्गाचे टप्पे केले आहेत. एकेक टप्पा पूर्ण झाला की तो सुरू केला जात आहे. आगाखान पॅलेसजवळचा मार्ग बदलावा लागला, कोरोनाकाळ आला, त्याशिवाय जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनसाठी भूसंपादनात वेळ गेला. त्यामुळे विलंब झाला. स्थानकापर्यंत नेणाऱ्या काही पुलांची कामे अपुरी आहेत; पण येत्या २ महिन्यांत ती पूर्ण होतील.’