काही तक्रारी असल्यास लेखी द्या; मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंचे आवाहन

By राजू इनामदार | Published: November 28, 2024 05:27 PM2024-11-28T17:27:25+5:302024-11-28T17:32:32+5:30

मते कमी का मिळाली? काय करण्याची गरज आहे असे वाटते? स्थानिक पदाधिकारी काम करत होते का? असे प्रश्न विचारत ठाकरेंनी उमेदवारांना बोलते केले

If there are any complaints put them in writing Raj Thackeray appeals to the defeated candidates of MNS | काही तक्रारी असल्यास लेखी द्या; मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंचे आवाहन

काही तक्रारी असल्यास लेखी द्या; मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची भेट घेतली व त्यांच्यात उमेद जागृत केली. ठाणे व मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ८२ उमेदवार, त्यांचे स्थानिक जिल्हाध्यक्ष व अन्य प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. काही तक्रारी असतील तर त्या लेखी द्याव्यात असे आवाहन राज ठाकरे यांनी उमेदवारांना केले.

माध्यमांबरोबर काहीही संवाद न साधता बैठकीनंतर ते लगेचच निघून गेले. दांडेकर पुलावरील एका कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते. सकाळीच राज तिथे आले. त्यांच्याआधी सर्व उमेदवार व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यातील उमेदवार व शहराध्यक्ष साईनाथ बाबर तसेच गणेश भोकरे, संपर्क नेते बाबू वागसकर व अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज यांनी सर्व उमेदवारांची विचारपूस केली. त्यांच्या मतदारसंघात काय झाले? मते कमी का मिळाली? काय करण्याची गरज आहे असे वाटते? स्थानिक पदाधिकारी काम करत होते का? तुमच्यासमोर काही अडचणी आहेत का? असे विविध प्रश्न विचारत त्यांनी उमेदवारांना बोलते केले. बहुसंख्य उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी मनसेने राज यांच्या सभा होण्याची गरज होती असे सांगितले. त्याचबरोबर ठाम भूमिका घेऊन निवडणूक लढवली हे पक्षासाठी चांगलेच झाले. मात्र, आता संघटन वाढवणे आवश्यक आहे असेही मत व्यक्त केले.

सुमारे तासभर थांबल्यानंतर राज निघून गेले. माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी बोलणे टाळले. नंतर संपर्क नेते वागसकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाध्यक्ष खास बैठकीसाठी आले होते. त्यांनी सर्व माहिती घेतली, त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेविषयी काही तक्रारी असतील, मतदान यंत्रांविषयी काही सांगायचे असेल तर ते लेखी पाठवावे असे त्यांनी उमेदवारांना सांगितले. आम्हीही पुरावे जमा करत आहोत. काही उमेदवार त्यादृष्टीने काम करत आहेत. पुरेसे पुरावे जमा झाल्यानंतर पक्षाध्यक्ष ठाकरे यांना ते दाखवले जातील व पुढे त्यांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे वागसकर यांनी सांगितले.

Web Title: If there are any complaints put them in writing Raj Thackeray appeals to the defeated candidates of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.