.....अशी माणसे असतील तर बदल होणारचं असा विश्वास वाटतो: डॉ. बाबा आढाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 07:44 PM2019-12-18T19:44:19+5:302019-12-18T19:57:47+5:30
नाटक संपल्यानंतर देखील निळूभाऊ आणि डॉक्टर हातात झोळी आणि पंचा घेऊन लोकांसमोर उभे राहिले....
पुणे: डॉ. श्रीराम लागू हे सामाजिक कृतज्ञता निधीचे संस्थापक अध्यक्ष होते. हा निधी १९८९ पासून सुरू झाला. राज्यात लग्नाच्या बेडी नाटकाचे ५० प्रयोग करून डॉ. लागू, निळू फुले, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी यांनी 25 लाख रूपयांचा निधी जमविला. समाजात जी काम करणारी मुले आहेत. जी कोणत्याही राजकीय पक्षांशी निगडित नाहीत, अशा कार्यकर्त्यांना मानधन दिले जावे यासाठी ही निधीची योजना होती. डॉ. लागू यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी ती उचलून धरली. नाटकातल्या भूमिका जशा त्यांनी मन लावून केल्या तशा सार्वजनिक जीवनातील जबाबदारी देखील त्यांनी तितक्याच समरसतेने उचलली. नाटक संपल्यानंतर देखील निळूभाऊ आणि डॉक्टर हातात झोळी आणि पंचा घेऊन लोकांसमोर उभे राहिले. त्यावेळी हजारो रुपये जमले. एखाद्या कामात समर्पित होऊन काम करण्याची त्यांच्यात वृत्ती होती. दोघांवरही सेवादलाचे संस्कार होते.
डॉ. लागू यांच्या सामाजिक कार्याचे आणखी एक मोठेपण म्हणजे त्यांनी केलेला सत्याग्रह. शनी शिंगणापूरला महिलांना प्रवेश नव्हता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्याग्रह करण्याचे ठरविले. त्यामध्ये डॉ. लागू यांनी पुढाकार घेतला. डॉ. एन.डी पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. लागू, निळू फुले सर्वजण नगरला जमले आणि तिथून सत्याग्रहाची तुकडी निघाली. तेव्हा पोलिसांनी लगेच अटक केली. तिथल्या पोलीस कोठडीत आम्हाला ठेवण्यात आले. दुस-या दिवशी आम्हाला न्यायालयात हजर करणार होते. डॉ. लागू तयारीनीशी आले होते. न्यायालयात ते बसून होते. डॉ. लागू यांनी सत्याग्रह करणं ही आमच्यासाठी आश्चर्यकारक होते. लोक सहानुभूती दाखवतात. मायेचा हात फिरवतात. परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये सहभागी होणं. शांततामयी सत्याग्रहात भाग घेणं हे तितक सोपं नाही. आज त्यांची आठवण होते की शबरीमाला प्रकरणाचे अजून काही झाले नाही. डॉ. लागू यांच्यासारखी समाजधुरिणी, कलावंत मंडळी जेव्हा भाग घेतात तेव्हा प्रश्न सुटायला मदत होते. आणीबाणी विरोधात ही कलावंत मंडळी उभी राहिली होती. या माणसांसारखी माणसं जेव्हा कामाला पाठिंबा देतात. तेव्हा विश्वास वाटतो की बदल होणारचं. डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. श्रीराम लागू किंवा निळू फुले यांच्यासारखी माणसे जाण्यामुळे पोकळी ही जाणवत राहाणार. राजकीय पद मिळविण्यापेक्षा सामाजिक बदलांसाठी काम करणं अधिक महत्वाचं आहे.
------------------------------------------------------------------------------------------