जमीन संपादनाला गोंधळ असेल तर चौकशी होईलच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:40+5:302021-07-02T04:09:40+5:30
--- रांजणगाव सांडस: शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक ३ साठी शिरूर तालुक्यातील सरदवाडी, करडेघाट परिसरातील जमीन संपादन ...
---
रांजणगाव सांडस: शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक ३ साठी शिरूर तालुक्यातील सरदवाडी, करडेघाट परिसरातील जमीन संपादन प्रक्रियेत काही त्रुटी व गोंधळ झाला असेल याबाबतची चौकशी करण्याचे आदेश उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.
या भागातील जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना वाढवून मिळण्याबाबत उच्चाधिकार समितीकडे उद्योग खात्याकडून लवकर प्रस्ताव दाखल केला जाईल, असे आश्वासन तटकरे यांनी दिले. रांजणगाव एमआयडीसीतील टप्पा तीन मधील गावे सरदवाडी, करडे घाट परिसरात २०१७ ला झालेल्या भू-संपादनाबाबत स्थानिकांना विश्वासात घेतले नाही, काही शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून भूसंपादनास संमती असल्याचे दाखवले गेले होते. त्यातच तत्कालीन सत्ताअधिकारी व्यक्तींनी संबंधित बड्या राजकीय वजन असणाऱ्यांच्या जमिनीला जास्त भाव दिला, तर सामान्य शेतकरी असलेल्या शेतकरी यांच्या जमिनीला कमी भाव दिला, अशा स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या भूसंपादनात काही शेतकऱ्यांचा विरोध असून, यांची एमआयडीसीकरिता जमीन देण्याची संमती आहे, त्यांनीही मोबदला वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे.
याबाबत काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर सरदवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानेे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याशी (गुरुवारी) चर्चा केली. याबाबत आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने तटकरे यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिरूर सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब भोसले, उद्योग खात्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती फरोग मुकादम, भूसंपादन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक गोपीनाथ ठोंबरे, उद्योग सहसचिव किरण जाधव उद्योग खात्याचे विभागीय अधिकारी पुणे, अविनाश हदगल, शिरूरचे प्रांताधिकारी संतोष देशमुख, हवेलीचे प्रांत सचिन बारवकर यावेळी उपस्थित होते.
सरदवाडी उपसरपंच कृष्णा घावटे, नानासाहेब नगर, अनिल कर्डिले, दत्ता सरोदे, बाळासाहेब कर्डिले या स्थानिक शेतकरी शिष्टमंडळांनी बैठकीच्या सुरुवातीला आपल्या मागण्या मांडल्या. जमिनीचा मोबदला देताना शेतकऱ्यांना एक बड्या नेत्यांना अधिक असा दुजाभाव झाला आहे. संबंधित जमिनीचा मुद्रांकशुल्क भरला नाही. त्याची चौकशी करावी अशी मागणी आमदार पवार यांनी केली आहे. रांजणगाव एमआयडीसीतील मोकळे प्लॉट बळकावून वाहनचालकांकडून बेकायदा हप्ता वसूल केले जात असून, याबाबतीत संबंधित वर कारवाई करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.
--
चौकट
... तर कंपन्यांना विरोध : पवार
स्थानिकांना उद्योग-धंद्यांतून रोजगार मिळून त्यांच्या जीवनात बदल घडणार असतील, तर आमचा एमआयडीसीला विरोध नाही. परंतु शेतकऱ्यांना मातीत घालून कंपन्या उभ्या राहणार असतील, तर त्याला विरोध करणार. कारखानदारीतून बेरोजगारीचा प्रश्न सुटून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थित मोबदला दिला पाहिजे अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली.
--
फोटो क्रमांक : ०१ मोबदला अशोक पवार
फोटो ओळी : उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देताना आमदार अशोक पवार.