दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात; प्रशांत जगतापांचे आव्हान
By राजू हिंगे | Published: November 7, 2023 02:33 PM2023-11-07T14:33:19+5:302023-11-07T14:34:12+5:30
जनतेची पसंती आम्हाला असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये खरोखर जनतेला सामोरे जाण्याची हिम्मत असेल तर पुढील दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात
पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आघाडीवर आहोत असा दावा सत्तेतील सर्व पक्ष करत आहेत. जनतेची पसंती आम्हालाच आहे हा त्यांचा दावा खरा असेल आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खरोखर जनतेला सामोरे जाण्याची हिम्मत असेल तर पुढील दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात. असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक या कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आमचाच पक्ष एक नंबर हा सत्तेतील पक्षांचा दावा हास्यास्पद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडुकांच्या बाबतीत विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकांवर उत्तर सादर करायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही, त्यामुळे जनता त्यांच्या लोकप्रतिनिधींपासून वंचित आहे. एका बाजूला जनतेला त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व नाकारण्याचे पाप हे सरकार करत असताना दुसऱ्या बाजूला जनतेचा कौल आम्हालाच आहे असा दावा करत आहे. हा दावा खरा असेल तर सरकारने तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.