VIDEO : पाणी बंद केले तर गुन्हा दाखल करणार : मुक्ता टिळक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 04:36 PM2019-01-17T16:36:08+5:302019-01-17T17:10:42+5:30
पूर्व सूचना न देता पाणी बंद केल्यास पाेलिसात गुन्हा दाखल करु असा इशारा महापाैर मुक्ता टिळक यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
पुणे : जलसंपदा विभागाने काल कुठलिही पुर्वसूचना न देता पुण्याचे पाणी बंद केल्याने महापाैर मुक्ता टिळक यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आज तातडीची बैठक घेतली. त्यात जर पुन्हा अशा पद्धतीने जलसंपदा विभागाने पुण्याचे पाणी बंद केले तर पाेलिसात गुन्हा दाखल करु असा इशारा टिळक यांनी जलसपंदा अधिकाऱ्यांना दिला.
पुण्याच्या पाण्यावरुन राजकारण पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. बुधवारी जलसंपदा विभागाने पर्वती जलशुद्दीकरण विभागाला देण्यात येणारे पाणी अचानक बंद केले. त्याचे तीव्र पडसाद उपटले. महापाैर मुक्ता टिळक यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेत पुण्याची पाणी कपात करण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या. महापाैर म्हणाल्या, काल अचानक पाणी पुरवठा बंद करुन पुणेकरांना दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला. त्यामुळे आज जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत मी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली. अशा पद्धतीने पाणी बंद करण्याचा अधिकार पाठबंधारे विभागाला नाही. आम्हाला पाेलिसात जाण्याची वेळ जलसंपदा विभागाने आणू नये. 1350 एम एल डी पाणीपुरवठा पुणे पालिकेला केला जाताे. ताे यापुढेही असाच सुरु ठेवण्याचे पत्र पालिका आयुक्त पाठबंधारे खात्याला देणार आहेत.
जलसंपदा विभागाला पाणी कपात करायची असेल तर मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात यावा. ताेपर्यंत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेऊ नयेत. पुणेकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन देखील टिळक यांनी केले.