‘बेदरकार’वाहन चालविल्यास करिअरला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:08 AM2018-12-20T02:08:07+5:302018-12-20T02:08:33+5:30

तब्बल ९० गुन्हे दाखल : ७५ गुन्ह्यांमध्ये झाली शिक्षा; कलम २७९ व २८३ नुसार कारवाई

If the 'unscrupulous' driver does not interfere with the careers | ‘बेदरकार’वाहन चालविल्यास करिअरला अडथळा

‘बेदरकार’वाहन चालविल्यास करिअरला अडथळा

googlenewsNext

पुणे : वाहनचालकांच्या बेदरकार वृत्तीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी गुन्ह्यांची मात्रा वापरण्यास सुरुवात केली आहे. दत्तवाडी पोलिसांनी चार महिन्यांमध्ये भादंवि कलम २७९ आणि २८३ नुसार केलेल्या कारवायांमध्ये तब्बल ९० गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७५ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. यामुळे बेदरकार वाहनचालकांच्या करिअरमध्ये अडथळा येऊ शकतो.

पुणे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत सुसाट जाणारे वाहनचालक पाहायला मिळतात. उरात धडकी भरविणारा त्यांचा वेग पाहून सर्वसामान्यांना अक्षरश: थिजल्यासारखे होते. यासोबतच रस्त्यावर कुठेही वाहन उभे करण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. यामुळे अपघातांची शक्यता वाढते. या वाहनचालकांवर कारवाई करण्यामध्ये मनुष्यबळाअभावी वाहतूक पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. स्थानिक पोलिसांनाही याप्रकारे गुन्हे दाखल करण्याचे अधिकार आहेत. मात्र, त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही.
पुणे महापालिकेच्या मैला वाहून नेणाऱ्या वाहनावर दत्तवाडी पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई केली होती. नो एंट्रीमधून बेदरकारपणे गाडी चालवत अन्य लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी सज्जन विजय खाडे (रा. म्हसवड, ता. माण, सातारा) याच्याविरुद्ध कलम २७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या चार तासांत आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये न्यायालयाने खाडेला १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली होती. ही घटना १७ सप्टेंबरला घडली होती.
अशा प्रकारे आतापर्यंत दत्तवाडी पोलिसांनी विविध रस्त्यांवर कारवाई करीत ८० गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७५ आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत
शिक्षा सुनावली आहे. या वाहनचालकांना एकूण ९० हजारांचा दंड झालेला आहे.

भविष्यात होऊ शकते अडचण निर्माण
वाहतूक नियमभंगाबद्दल गुन्हा दाखल झाल्यास विद्यार्थ्यांना आणि तरुणांना भविष्यात अडचणी येऊ शकतात. पासपोर्ट आणि अन्य कामांसाठी पोलीस पडताळणीच्या वेळी अडचणी येऊ शकतात. दाखल गुन्ह्यांमुळे करिअरला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालविणे आवश्यक असल्याचे घेवारे यांनी सांगितले.

वाहनचालकांनी बेदरकारपणे; तसेच ओव्हरस्पीडने वाहन चालवू नये. नो एंट्री आणि विरुद्ध बाजूने येणे टाळावे. रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक, महिला, गरोदर महिला, लहान मुले जात असतात. तसेच, अन्य वाहनचालकांनाही तुमच्या चुकीमुळे प्राण गमवावा लागू शकतो किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे स्वत:सोबत इतरांचा जीव धोक्यात घालू नका; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. गुन्हा दाखल झाल्यास पुढे सर्वच गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात. घाई न करता वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांची संख्या कमी होईल आणि वाहतुकीला शिस्तही लागेल.
- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे

283कलम

४सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, अन्य प्रवाशांना धोका निर्माण करणे या कारणासाठी आर्थिक दंडाची तरतूद असून न्यायालयाद्वारे शिक्षाही होऊ शकते.

279कलम

४मानवी जीवितास धोका, दुखापत, नुकसान होईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे. या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा होऊ शकते. दोषी वाहनचालकास सहा महिन्यांपर्यंतची कैद, आर्थिक दंड अथवा दोन्ही अशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकते.

 

Web Title: If the 'unscrupulous' driver does not interfere with the careers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.