पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:09+5:302021-07-29T04:10:09+5:30
कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी सांगवी : सांगवी (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडून अपुरा, अनियमित ...
कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी
सांगवी : सांगवी (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडून अपुरा, अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना राबवून स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास महिला व आबालवृद्धांसह ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच भानुदास जगताप यांनी ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे दिला आहे. सध्या जिल्ह्यात सामाधानकारक पाऊस झाला असताना देखील परिसरात पाणीपुरवठ्याच्या योग्य नियोजनाअभावी पाण्याचा प्रश्न कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सांगवी गावात दोन दिवसांआड दूषित व अपुऱ्या पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. मिलिंदनगर येथे वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न कायम असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावात दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तीन ते चार दिवस पाणी कसे पुरवायचे हा मोठा प्रश्न आता ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. गावात दीड लाख क्षमतेची पाण्याची टाकी आहे. पाणीपुरवठा करत असताना पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली असताना पाणी सोडल्यास पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत असतो,मात्र, टाकीतील पाणी खाली गेल्यानंतर मिलिंदनगर भागात पाणीपुरवठा होत असतो, गावात इतर ठिकाणी पूवीर्पासून जुन्या चार इंची पाईप लाईन आहेत. तर मिलिंदनगर येथे तीन इंची पाईपलाईन असल्याने आणखी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यापुढे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे.
---------------------------
मिलिंदनगर परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य ती काळजी घेऊन स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार आहोत. तसेच जलप्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणा नंतर गावात लवकरात लवकर नवीन जलवाहिन्यांच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- चंद्रकांत तावरे
(सरपंच सांगवी ग्रामपंचायत)
-----------------------------
सध्या केनॉलच्या कामकाजामुळे साठवण तलावात पाणी अल्प प्रमाणात असल्याने पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मागील महिनाभरापूर्वी जल प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी जुन्या पाण्याच्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गावातील सर्वच जलवाहिन्यांचे नव्याने कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे पुढील काळात पाण्याची समस्या मिटणार आहे.
- संजय चांदगुडे
(ग्रामविकास अधिकारी )