हम काले हैं तो क्या हुआ ‘दिलवाले’ हैं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:01 AM2018-07-22T04:01:01+5:302018-07-22T04:01:23+5:30
पदोपदी अपमानाचे शल्य का वागवायचे?; कथा अन् व्यथा नायजेरियन विद्यार्थ्यांची
युगंधर ताजणे
पुणे : पृथ्वीवरील नायजेरिया नावाच्या एका देशातून आम्ही आलो आहोत. यात वेगळं असे काय आहे? मात्र, आम्हाला दर वेळी आमच्या रंग आणि रूपावरून डिवचले जाते. तुम्हाला जसा तुमच्या देशाचा अभिमान आहे, तसा आम्हालादेखील आमच्या देशाचा असला तर वाईट काय? हल्ली काही जण आमची ‘नायजेरियन’ म्हणून कुचेष्टा करतात. काही झाले तरी पहिली शिवी रंगावरूनच का? ही व्यथा आहे पूर्वेकडचे आॅक्सफर्ड समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिकणाºया नायजेरियन विद्यार्थ्यांची. आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी त्यांनी आता ‘द इम्पॅक्ट’ नावाचे मासिक सुरू केले आहे.
पुण्यात शिकण्याकरिता आलेल्या नायजेरियन विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, अद्यापही बºयाचशा लोकांच्या मनात त्यांच्या देशाविषयीचे वेगळे चित्र घर करून आहे. वास्तविक प्रचंड गरिबी, शिक्षणाची कमतरता, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, बेरोजगारी, अशी परिस्थिती असल्याने तेथील विद्यार्थी शिक्षणाकरिता मोठ्या संख्येने भारतात येतात. त्यातही बरेच जण पुण्यात शिकण्याला प्राधान्य देतात. काही वर्षांपासून या विद्यार्थ्यांना आपल्याला रंग आणि रूपावरून चिडवले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जगाच्या पाठीवर ‘कल्चरल हब’ म्हणून ओळख प्रस्थापित केलेल्या शहरात रंगरूपावरून चिडवण्याचा प्रकार क्लेशदायक होता. यासंंबंधीचे लिखाण नायजेरियन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘द इम्पॅक्ट’ नावाच्या मासिकात वाचता येणार आहे. नायजेरियन तरुणाईच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या मासिकाचे प्रकाशन शुक्रवारी पार पडले. लोक विचार करतात, की नायजेरिया म्हणजे ड्रग्ज आणि गुन्हेगारीचे आगर आहे; मात्र ते सत्य नाही. आम्ही या ठिकाणी शिकण्यासाठी आलो असून त्यादरम्यानच्या काळात आमच्याकडील संस्कृतीविषयी दुसºयांना सांगण्यास नक्कीच आवडेल. भारत आणि नायजेरिया यांच्यातील संबंध सौहार्दाचे आहेत. मात्र, काही लोकांकडून आम्हाला तिरस्काराची वागणूक मिळते आहे. त्यांच्या बोलण्यातून आमच्या संपूर्ण नायजेरियन देशवासीयांबद्दल राग व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, त्रास देणाºयाविषयी तक्रार दिल्यास त्याचे उलटे परिणाम आम्हाला भोगावे लागत असल्याची भीती एझाकेल बॉक या विद्यार्थ्याला आहे.
नायजेरियन विद्यार्थ्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या संघात्मक कार्यक्रमांना २०१६मध्ये सुरुवात झाली. आमच्यातील काही जणांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा फटका इतरांना सहन करावा लागत असल्याचे नायजेरियन विद्यार्थी मान्य करतात. विविधतेत एकता असणाºया या देशातील सांस्कृतिकतेचा अभ्यास करताना शिक्षण, सामाजिक उपक्रमांना न्याय देणे आमचे मुख्य ध्येय असल्याचे आमादी सोलोमसेज सांगतो. आम्हाला येथे नायजेरियन पदार्थांची चव घेता येत नसली तरी पुण्यात राहून आता पाणीपुरी, चपाती आणि सँडविच यांच्याविषयी प्रेम निर्माण झाल्याची भावना आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांना घरमालक राहण्याकरिता घर देत नाही, ही मुख्य अडचण आहे. अगोदर राहणाºयांनी केलेल्या चुकीच्या कृतीमुळे त्याचे झळ या विद्यार्थ्यांना सोसावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी असणारी परिस्थिती व आताची स्थिती यांत फरक पडल्याचे विद्यार्थी सांगत असले, तरीदेखील अद्यापही स्थानिकांकडून होणाºया अरेरावीची चर्चा त्यांच्यात आहे.
हक्क, सुरक्षा सजगतेसाठी ‘विद्यार्थी समिती’
नायजेरियन विद्यार्थ्यांनी आता आपल्या सर्व बांधवांची मिळून नायजेरियन विद्यार्थी समिती स्थापन केली असून तिचे अध्यक्षपद जियांग सॅम्युएलकडे आहे. गिफ्ट स्लायव्हरनस उथाह (उपाध्यक्ष), एझाकेल बॉक (सचिव), ओमोटोसो जेबेंगा डॅनियल (खजिनदार), अकिनसन्या मयोक्यून हमीद (क्रीडा संचालक) आणि आमादी सोलोमन तोची (जनसंपर्क).
द इम्पॅक्टमध्ये काय आहे..?
वर्षातून एकदा प्रकाशित होणाºया या अंकामध्ये नायजेरियन जीवनमानाविषयी सकारात्मक भाष्य करण्यात आले आहे. तसेच, आतापर्यंत झालेल्या चुकीच्या प्रचाराचे सांगोपांग विश्लेषण यात देण्यात आले असून एकूण ५९ लेखांचे संकलन अंकात समाविष्ट करण्यात आले आहे. सद्य परिस्थितीबद्दल नायजेरियन विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आणि अनुभव यांचे शब्दचित्र या अंकात आहे.