राजकीय आहोत तर राजकारणापासून बाजूला कशासाठी? पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 09:57 AM2023-02-09T09:57:57+5:302023-02-09T09:58:04+5:30
मागील सलग १० वर्षे शहराच्या राजकारणात मनसेने कायमच तटस्थ भूमिका घेतल्याने नगरसेवकही कमी झाले
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काहीच भूमिका नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून राजकारणात आहोत तर राजकारणापासून, निवडणुकीपासून का आणि किती काळ बाजूला रहायचे, असा प्रश्न कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनाही पडला आहे.
मागील सलग १० वर्षे शहराच्या राजकारणात मनसेने कायमच तटस्थ भूमिका घेतली आहे. यापूर्वीच्या महापालिका सभागृहात मनसेचे २९ नगरसेवक होते. मात्र ती ५ ही वर्षे मनसेने शहराच्या विविध प्रश्नांवर सभागृहात झालेल्या मतदानात कायमच तटस्थ अशी भूमिका घेतली. त्याचा फटका बसून नंतरच्या पंचवार्षिकमध्ये त्यांचे फक्त २ नगरसेवक निवडून आले. त्यांनीही सभागृहात मागील ५ वर्षांत कधीच ठोस भूमिका घेतली नाही.
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली तर आम्ही निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले होते. त्याचबरोबर महाविकास आघाडी व अन्य पक्षांनाही महाराष्ट्राची परंपरा वगैरेची आठवण करून देत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र भाजपने टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न देता अन्य पदाधिकाऱ्याला उमेदवार जाहीर केले.
त्यानंतर मनसेने निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा असे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे मत होते. सन २०१९ ची कसबा विधानसभेची निवडणूक मनसेने लढवली होती. तत्कालीन शहराध्यक्ष अजय शिंदे त्यावेळी उमेदवार होते. त्यांना ८ हजार मते मिळाली होती. यावेळी मात्र त्यांनीही उमेदवारीची मागणी केली नाही व पक्षानेही काही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे मनसेचे कसब्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जाहीरपणे बोलत नसले तरीही आपण राजकीय पक्ष आहोत तर मग निवडणुकीपासून किती काळ व कशासाठी लांब रहायचे, असे प्रश्न ते विचारत आहेत.
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्रात हनुमंताची पहिली जाहीर आरती कसब्यातीलच कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत सहभागी होण्याची तीव्र इच्छा होती. पण पक्षाच्याच पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राज यांना निवडणूक लढवायला नको, असा सल्ला दिल्याचे या नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांना पक्षासाठी राबायला नको, म्हणून ते अन्य तरुण कार्यकर्त्यांना नेहमीच विरस करतात असे बोलले जात आहे.
आता उमेदवार नाही तर निदान आम्हाला आम्ही करायचे का, कोणाच्या प्रचारात सहभागी व्हायचे की नाही ते तरी सांगा असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यातही पक्षाध्यक्षांनी कोणाच्याही प्रचारात सहभाग घ्यायचा नाही, असे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
''निवडणूक लढवायची नाही अशी आमची ठाम भूमिका होती. गुरुवारी (दि. ९) आमची बैठक होत आहे. कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचे याचा निर्णय त्यात होईल. राज यांनी अजूनतरी तटस्थ रहा किंवा कोणाचे काम करा अशा पद्धतीचा आदेश दिलेला नाही. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. - अनिल शिदोरे, मनसे नेते''