दोन दिवसात घरे न मिळाल्यास पालिकेत राहू : आंबिल ओढा पूरग्रस्त कुटुंबांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 12:01 PM2019-11-04T12:01:36+5:302019-11-04T12:01:55+5:30
येत्या दोन दिवसात त्यांना घर न मिळाल्यास पालिकेच्या इमारतीत अथवा एसआरए प्रशासकीय इमारतीत ही कुटुंबे राहण्यास येतील.
पुणे : आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात बाधित झालेल्यांना दोन दिवसात घरे न मिळाल्यास, महापालिकेच्या व एसआरए च्या इमारतीत आम्ही राहण्यास येऊ असा इशारा दांडेकरपूल येथील बाधित कुटुंबियांनी दिला आहे़.
दरम्यान, बाधित कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठीच आमचा प्रयत्न असून, यामुळे पुनर्वसनकरिता उशिर होत असल्याचा दावा पालिका उपायुक्त माधव देशपांडे यांनी केला आहे़. तर एसआरएने आत्पकालीन परिस्थितीत पुर्नवसन करणे हे एसआरएचे काम नसल्याचे सांगून, केवळ पात्रता तपासूनच संबंधितांना घरे दिली जातील, अशी भूमिका एसआरए प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी घेतली आहे़.
पालिकेने शाळेतील प्रारंभीच्या २६ कुटुंबांची व अधिकच्या १२ कुटुंबांची यादी एसआरएला दिली असल्याचे सांगितले असले तरी, एसआरएने मात्र ही यादी मिळाली नसल्याचे सांगितले आहे़. सदर ३८ पुरग्रस्त कुटुंबे सध्या महापालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे हायस्कूल शाळा क्रमांक १७ मध्ये २७ सप्टेंबरपासून मुक्कामास आहेत़. तर दुसरीकडे २५ सप्टेंबरच्या अतिवृष्टीत बाधित झालेली अनेक कुटुंबे राजेंद्रनगर येथील एसआरएच्या घरांमध्ये अनाधिकृतरित्या घुसले असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम एसआरएकडून होत आहे़. यामुळे घरे उपलब्ध झाल्यास व पात्रता तपासणी झाल्यावर त्यांचे पुर्नसवन होऊ शकणार आहे़. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी गुरूवारपर्यंत या कुटुंबांचे एसआरएच्या घरांमध्ये पुर्नवसन होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे़.
घरे मिळाली नाही तर पालिकेच्या इमारतीत राहू....
सन २००५ व २०१२ मध्ये दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पुर्नसवसनाबाबत सर्वेक्षण झाले आहे़. तरीही नव्याने यादी करीत असल्याचे कारण सांगून, गेल्या दीड महिन्यापासून या कुटुंबांना दोन्ही प्रशासनाने वेठीस धरले आहे़ दिवाळी सणही त्यांनी या शाळेत साजरा केला तरी, प्रशासनाला त्याचे घेणेदेणे नाही़. परिणामी, येत्या दोन दिवसात त्यांना घर न मिळाल्यास पालिकेच्या इमारतीत अथवा एसआरए प्रशासकीय इमारतीत ही कुटुंबे राहण्यास येतील, असा इशारा मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. ग़णेश सातपुते यांनी दिला आहे़. तसेच या सर्व चालढकल प्रकाराची चौकशी पालिका आयुक्तांनी स्वत: करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे़.