पुणे शहराच्या पूरस्थितीचा पिच्चर अभी बाकी है
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 09:24 PM2019-09-26T21:24:29+5:302019-09-26T21:26:29+5:30
पुण्यात निर्माण झालेली आपत्कालिन परिस्थीती ही मानवनिर्मित व मानवदुर्लक्षित असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी व्यक्त केले.
पुणे : शहरामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेली आपतकालीन परिस्थिती व आलेला पूर हा केवळ ट्रेलर आहे. शहराली ओढे-नाल्यावर झालेली प्रचंड अतिक्रमणे, शहरालगतच्या डोंगर, टेक्यांवरील वृक्षतोड, बेसुमार केलेले उत्खनन यामुळे डोंगर उतारावरून पावसाचे पाणी प्रचंड वेगाने वाहून येत असून, अतिक्रमाणामुळे ओढ्याची वहन क्षमता प्रचंड कमी झाली आहे. यामुळे भविष्यात प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी लोकमतशी बोलताना दिला.
शहरामध्ये प्रामुख्याने दक्षिण पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी आंबील ओढ्याला पूर आल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली. शहराच्या इतर भागात देखील अनेक ओढ्या नाल्यांना आलेल्या पूरामुळे हजारो नागरिक बांधित झाले असून, काहींना आापला जीव गमवावा लागला. अनेर जनावरे वाहून गेली. सार्वजनिक व खाजगी संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत पर्यावरण तज्ज्ञ यादवाडकर यांनी लोकमतला वस्तुस्थितीची माहिती दिली. याबाबत त्यांनी सांगितले की, शहरामध्ये बुधवारी रात्री निर्माण झालेली आपतकालीन परिस्थिती मानव निर्मिती व मानव दुर्लक्षित आहे. शहरामध्ये मुळा-मुठा नदीला एकूण ५५ लहान-मोठे ओढे नाले मिळतात. परंतु यापैकी २०-२५ टक्के ओढे सुद्धा अस्तित्वात राहिलेले नाही. यामध्ये अनेक ओढे प्रशासन व बिल्डरांनी संगनमताने बुजविण्यात आले आहेत. यामुळे थोडा पाऊस झाला तरी शहराच्या रस्त्यांना ओढे नाल्याचे स्वरुप येते.
नागरिक, बिल्डर यांच्या सोबतच प्रशासनाने देखील शहरातील ओढे-नाले, नद्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रण केले आहे. प्रशासनाने ओढ्यामध्ये पाणी, ड्रेनेज लाईन टाकल्या असून, यासाठी मोठ-मोठे कलवड देखील बांधले आहेत. अनेक भागामध्ये संरक्षण भित्तीच्या नावाखाली ओढ्या-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाहच बंद केला आहे. यामुळेच भविष्यात शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
आंबील ओढ्याची विर्सग क्षमता २४ हजार क्युसेक्स
शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झालेल्या आंबील ओढ्याची मुठा नदीतील विर्सग क्षमता तब्बल २४ हजार क्सुसेक ऐवढी प्रचंड आहे. यामुळे खरे तर या आंबील ओढ्याला छोटी नदी म्हणूनच गृहत धरणे अपेक्षित होते. कात्रज येथे उगम असलेल्या या आंबील ओढ्याला कात्रज डोंगरातून देखील एक ओढा येऊन मिळतो. परंतु प्रशासनाने याला ओढा जाहीर करून यावरील अतिक्रमणे करण्यासाठी वाटच निर्माण करुन दिली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत या ओढ्याचे अनेक भागात अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. आंबील ओढ्याची विर्सग क्षमत लक्षात घेता नदी म्हणून घोषित करुन, ब्ल्यू लाईन, रेड लाईन निश्चित करण्याची गरज होती. परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जाते.
‘मेरी’ कडून २०१० मध्ये दिला होता इशारा
केंद्र शासनाने सर्व राज्यांना आपल्या राज्यातील क्लायमेट चेंज संदर्भांत काय परिस्थिती निर्माण होऊ शकते या संदर्भातील सविस्तर अहवाल करण्याचे आदेश २००९ मध्ये दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) संस्थेला या संदर्भांत अहवाल देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मेरी संस्थेने राज्यातील प्रत्येक विभागाचा क्लायमेट चेंज संदर्भांत अत्यंत सविस्तर अहवाल शासनाला सन २०१० मध्ये सादर केला आहे. यामध्ये पुणे विभागामध्ये येत्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण तब्बल ३७.५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढणार असले तरी दिवस मात्र कमी होणार आहे. यामुळे अत्यंत कमी दिवसांत खूप जास्त म्हणजे ढगफुटी सारखा पाऊस पडेल असे स्पष्ट केले आहे. परंतु या अहवालाकडे राज्य शासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील दुर्लक्ष केले आहे.