सक्षम उमेदवार मिळाले तर कर्मयोगीची निवडणूक लढवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:33+5:302021-09-23T04:13:33+5:30

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्या ...

If we get a competent candidate, we will contest the election of Karmayogi | सक्षम उमेदवार मिळाले तर कर्मयोगीची निवडणूक लढवू

सक्षम उमेदवार मिळाले तर कर्मयोगीची निवडणूक लढवू

Next

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्या चांगल्या उमेदवारांचा शोध घेत आहे. असे सक्षम उमेदवार मिळाले तर शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करेन, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह येथे बुधवारी (दि. २२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील विशेष बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गारटकर म्हणाले, कर्मयोगी शंकराव पाटील यांनी साखर कारखाना अतिशय काटकसरीने चालवला. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र, याउलट परिस्थिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आधिपत्याखाली सद्य:परिस्थितीला निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाही. उसाचे पेमेंट अद्याप झाले नाही. वाहतूकदारांचे पैसे नाहीत. अशा अनेक समस्यांनी हा साखर कारखाना ग्रासला आहे. या सहकारी साखर कारखान्याला अत्यंत उसाची जवळची वाहतूक असताना देखील, आर्थिक अडचणीत कसा ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला.

कारखान्याच्या व्यवस्थापनाने कधी शेतकऱ्यांचे प्रपंच सुधारावेत, असा विचार केलेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय नाही. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार त्रस्त करून सोडले आहेत. नियोजनशून्य कारभार चालू असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या कारखान्यात चांगल्या पद्धतीने कारभार करू शकत नाहीत. केवळ हर्षवर्धन पाटील मनमानीने कारभार चालवतात, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे, तक्रार आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील आणि त्यांच्या पत्नी गेल्यानंतर अतिशय मनमानी पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी या कारखान्याचा कारभार चालवला आहे. कारखान्यावर आर्थिक कर्जाचा बोजा वाढतो आहे. जर पुन्हा हा कारखाना हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात ठेवला तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे शेतकऱ्यांचे, सभासदांचे म्हणणे आहे.

कारखान्याबद्दल कारभार मनमानी पद्धतीने चालतोय, ही भावना नुसत्या सभासदांची नाही, तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचीही आहे. कामगारसुद्धा म्हणताहेत पॅनल लावा व यांना हटवा, ऊस उत्पादक शेतकरी हाच हेका धरत आहेत. मात्र, त्या कारखान्यात मोठी गंमत आहे. हर्षवर्धन पाटलांनी ही संस्था कायम आपल्याकडेच राहावी, यासाठी काही नियम केले आहेत, असे गारटकर म्हणाले.

चौकट : माजी मंत्री यांनी ऊस उत्पादक सभासद उमेदवार होऊ नयेत याची काळजी घेतली

ज्या शेतकऱ्यांना या कारखान्यात ऊस घालायचा आहे, त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला जात नाही. मग असे शेतकरी कसे निवडणूक लढणार जे विरोधातील लोक आहेत. त्यांचे ठरावीक सभासद म्हणून नावे आहेत. मात्र, हे सभासद उमेदवार होणार नाहीत, याची विशेष काळजी हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली आहे. मात्र, सक्षम उमेदवार मिळाले तर निवडणूक लढविण्यात येईल. गुरुवारी ( दि. २३ ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निवडणुकीसंदर्भात निर्णय जाहीर करणार आहे, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

Web Title: If we get a competent candidate, we will contest the election of Karmayogi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.