'...तर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्मयोगीची निवडणूक लढवणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 11:49 AM2021-09-23T11:49:53+5:302021-09-23T11:55:19+5:30
सक्षम उमेदवार मिळाले तर, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगले उमेदवार व कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्यांच्या शोधात आहे. जर असे सक्षम उमेदवार मिळाले तर, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रागृह येथे बुधवार ( दि. २२ ) सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणूक संदर्भातील विशेष बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे माहिती देताना जिल्हाध्यक्ष गारटकर म्हणाले की, कर्मयोगी शंकराव पाटील यांनी साखर कारखाना अतिशय काटकसरीने चालवला, वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र याउलट परिस्थिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आधिपत्याखाली सद्य परिस्थितीला निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाही. ऊसाची पेमेंट अद्यापी नाहीत, वाहतूकदारांचे पैसे नाहीत. अशा अनेक समस्यांनी हा साखर कारखाना ग्रासला आहे. या सहकारी साखर कारखान्याला अत्यंत उसाची जवळची वाहतुक असताना देखील, आर्थिक अडचणीत कसा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला.
कारखान्याबद्दल कारभार मनमानी पद्धतीने चालतोय ही भावना नुसत्या सभासदांची नाहीतर, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची आहे. कामगार सुद्धा म्हणताहेत पॅनल लावा व यांना हटवा, ऊस उत्पादक शेतकरी हाच हेका धरत आहेत. मात्र त्या कारखान्यात मोठी गंमत आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी ही संस्था कायम आपल्याकडेच राहावी यासाठी काही नियम केले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.