"आम्ही सुटी घेतली तर शहरात कचऱ्याचे ढीग लागतील", रात्रंदिवस स्वच्छतेसाठी धडपडणारे कचरा वेचक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:08 PM2024-09-16T13:08:35+5:302024-09-16T13:09:07+5:30
कचरावेचक आणि नागरिक यांच्यातील नातेसंबंधदेखील यातून जोपासले जातात, स्वच्छ शहरासह नागरिकांच्या साथीने आणि पाठिंब्याने आम्ही उत्सवातदेखील सेवा देतो
पुणे: दररोज वेळेवर घरातील किंवा रस्त्यावरील कचरा उचलणाऱ्या अनेक महिला दिसतात. पहाटेपासून त्यांच्या कामाची सुरुवात होते. गणेशोत्सव म्हटलं की, शहरात लोकांची गर्दी होते. गर्दी झाली म्हणजे कचरा तर होणारच पण उत्सवादरम्यान कचऱ्याचे ढीग दिसून नयेत, म्हणून रात्रंदिवस स्वच्छता कर्मचारी परिसराची स्वच्छता करतात. या पडद्यामागच्या हातांचा सहभागदेखील महत्त्वाचा आहे.
मागील १५ वर्षांपासून सरू वाघमारे ‘कचरावेचक’ म्हणून काम करत आहेत. इतर वेळी परिसराची स्वच्छता करतात, मात्र उत्सवादरम्यान निर्माल्य संकलनाचे काम पाहतात. त्या म्हणाल्या, ‘अनेक वेळा आम्ही कचरा गोळा करण्याचे काम करतो. त्यामुळे त्या भागात ओळखी निर्माण होतात. उत्सव काळात कचरा गोळा करताना अनेक जण घरात बोलावतात, गणपतीचे दर्शन करत प्रसादही देतात. यातून आम्हाला कामाची ऊर्जा मिळते. त्यामुळे उत्सव काळात आम्हीच सुटीवर गेलो, तर कचऱ्यांचे ढीग साचतील.
कचरावेचक आणि नागरिक यांच्यातील नातेसंबंध जोपासले जातायेत
आमचे काम अत्यावश्यक सेवेत येते. या जबाबदारीची जाण आम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना आहे. गणपती विसर्जनावेळी मागील १५ वर्षांपासून निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवत आहोत. यावर्षीदेखील आम्ही नागरिकांना आवाहन केले आहे. विसर्जन घाटावर किंवा विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांवर निर्माल्य वेगळे द्या. त्यामध्ये इतर कोणताही कचरा नसावा, याची काळजी घ्यावी. शहराचे पर्यावरण आणि संस्कृती नागरिकांच्या साथीने जपण्यासाठी आम्ही यंदाही सज्ज आहोत. कचरावेचक आणि नागरिक यांच्यातील नातेसंबंधदेखील यातून जोपासले जात आहेत. स्वच्छ शहरासह नागरिकांच्या साथीने आणि पाठिंब्याने आम्ही उत्सवातदेखील सेवा देतो.