पंचकर्म शिकवायचेय तर हवेत २०० बेड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:36 AM2018-09-18T01:36:56+5:302018-09-18T05:15:25+5:30
आरोग्य विज्ञान विद्यापीठाची जाचक अट; संस्थाचालक अडचणीत
- श्रीकिशन काळे
पुणे : शरीर शुद्ध करायचे असेल, तर पंचकर्माशिवाय चांगला पर्याय उपलब्ध नाही. सध्या पंचकर्म विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल, तर संबंधित संस्थेकडे सुमारे २०० बेड असणे बंधनकारक आहे. अशी अटच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने लावली आहे. त्यामुळे पंचकर्म शिकविणारे संस्थाचालक डोक्याला हात लावून बसले आहेत.
नाशिक येथील महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयुर्वेद सर्टिफिकेट, फेलोशिप कोर्सेस खासगी संस्थांद्वारे चालविण्यासाठी देण्यात येतात. परंतु, त्यासाठी या संस्थांना विद्यापीठाकडे शुल्क भरावे लागते. सध्या पंचकर्म आणि आयुर्वेद प्रमाणपत्राचे केंद्र चालवायचे असेल, तर २ लाख ४० हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे, तर त्या केंद्राकडे २०० बेडही असायला पाहिजेत. अशा अटी विद्यापीठाने घातल्या आहेत.
त्यामुळे छोट्या संस्थांना हे कोर्सेस सुरू करता येणार नाहीत. परिणामी प्रशिक्षित मनुष्यबळच कमी निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला असून, या जाचक अटी कमी करण्याची मागणी डॉक्टर्सकडून होत आहे. सध्या प्रचंड प्रदूषण, बदललेली जीवनशैली, अवेळी जेवण या सर्वांचा परिणाम शरीरावर होत आहे. त्यामुळे पंचकर्म, मसाज यांची मागणी वाढत असून, त्याकडे नागरिकांचा कल अधिक दिसून येत आहे. आम्ही संस्थेद्वारे नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील आयुर्वेद पंचकर्म, कॉस्मेटोलॉजी, नर्सिंग इतर कोर्सेससाठी अर्ज करण्याचे ठरविले होते. परंतु, त्यासाठी असलेली फी आणि बेडची अट आम्हाला न पेलवणारी आहे. मग हे कोर्सेस कुठेच चालणार नाहीत. या जाचक अटी रद्द करून शुल्क कमी करावे, अशी आमची मागणी आहे, असे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुहास शितोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सध्या भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे पंचकर्म करण्यासाठी माणसे / थेरपिस्टची कमतरता आहे. सध्या देशात वा परदेशात पंचकर्म याविषयी जागरूकता झालेली आपण पाहतो. कारण अनेक व्याधी या औषधांना जुमानत नाहीत. अशावेळी पंचकर्मामुळे व्याधीला कारणीभूत असणारे घटक शरीराबाहेर काढले जातात. यामुळे आजार लवकर होण्यास मदत मिळते. अशा या पंचकर्म करणारी थेरपिस्टची असणारी कमतरता ही वैद्याच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. जर असे मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी लाखो रुपये शुल्क द्यावे लागत असेल, तर कोणीच हे कोर्सेस
चालविणार नाही. - डॉ. सुहास परचुरे, आयुर्वेदतज्ज्ञ
पंचकर्म आणि आयुर्वेद प्रमाणपत्र शिकविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सेंटरचे शुल्क कमी करण्याचा विचार सुरू आहे. तसचे २०० बेडचे रुग्णालय असावे, अशी अट आहे. तेदेखील कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- डॉ. कालिदास द. चव्हाण, कुलसचिव,
महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठ