हेडफाेन लावून गाडी चालवताय, सावधान !!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 06:13 PM2018-12-03T18:13:47+5:302018-12-03T18:15:45+5:30
पुणे वाहतूक पाेलिसांकडून हेडफाेन घालून गाणी एेकत जाणाऱ्यांवर तसेच फाेनवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून 200 रुपये इतका दंड अाकारण्यात येत अाहे.
पुणे : येत्या नवीन वर्षापासून पुणेकरांना हेल्मेट सक्तीला सामाेरे जावे लागणार असताना अाता हेडफाेन लावून गाडी चालवणेही पुणेकरांना महागात पडणार अाहे. पुणे वाहतूक पाेलिसांकडून हेडफाेन लावून गाणी एेकत जाणाऱ्यांवर तसेच फाेनवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून 200 रुपये इतका दंड अाकारण्यात येत अाहे. याबाबतची माहिती वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.
पुण्यात येत्या एक जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार अाहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे बंधनकारक अाहे. पुण्यात अनेकदा हेल्मेट सक्ती करण्यात अाली परंतु दरवेळेस पुणेकरांनी याला कडाडून विराेध केला. अाता पुन्हा एक तारखेपासून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार अाहे. त्या अाधी अाता हेडफाेन लावून गाणी एेकत तसेच फाेनवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यास वाहतूक पाेलिसांनी सुरुवात केली अाहे. सुरुवातीला विविध चाैकांमध्ये हेडफाेन लावून गाडी चालवणाऱ्यांचे पाेलिसांकडून समुपदेशन करण्यात अाले. त्यांना हेडफाेन घालून गाडी चालविण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. अाता वाहतूक पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत अाहे.
हेडफाेन लावून गाणी एेकत दुचाकी चालविल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. तसेच गाडी चालविताना लक्ष विचलित हाेण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचबराेबर अनेकजण हेडफाेन लावून फाेनवर देखिल बाेलत असतात. हेडफाेन लावून गाणी एेकत गाडी चालविणे कायद्याने चुकीचे अाहे. त्यामुळे वाहतूक पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत अाहे.