अजूनही विनाकारण फिरत असाल तर सावधान, पुण्यात गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:20 PM2020-03-27T12:20:41+5:302020-03-27T12:43:16+5:30
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,असे आवाहन प्रशासनाने वारंवार करूनही गुरुवारी दिवसभर सिंहगड रस्त्यावर काही नागरिक विनाकारण फिरताना दिसून आल्याने पुण्यातील सिंहगड रस्ता पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
पुणे: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,असे आवाहन प्रशासनाने वारंवार करूनही गुरुवारी दिवसभर सिंहगड रस्त्यावर काही नागरिक विनाकारण फिरताना दिसून आल्याने पुण्यातील सिंहगड रस्ता पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना विषाणू संसर्ग अनुषंगाने व सीआरपीसी कलम १४४ ची अंमलबजावणी करीत असताना काहीजण विनाकारण घराबाहेर पडून रस्त्याने फिरत असताना शासनाच्या आदेशाचे भंग केले असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवारी दुपारी तीन नंतर रस्त्यावर कोणतंही वाहन घेऊन जाता येणार नसल्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिल्यानंतर सिंहगड रस्त्यावर सोमवारी दुपारी तीननंतरही काही नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना चांगलाच दंडुक्याचा 'प्रसाद' दिला. मात्र त्यानंतर मंगळवारी व बुधवारी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी हात जोडून घरी थांबण्याची विनंती केली. मात्र तरीही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी वाढतच असल्याने पोलिसांनी आता थेट विनाकारण फ़िरणाऱ्यांवर गुन्हेच दाखल करावयास सुरुवात केली आहे. नवले पूल, वडगांव पूल, अभिरुची मॉल परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हि कारवाई १४ एप्रिल पर्यंत करणार असल्याचेही सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले. नाकाबंदीदरम्यान भाजीपाला, औषधी, किराणा, दूध घेण्याच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली असता ते राहण्यास वेगळ्याच ठिकाणी असून खरेदीसाठी वेगळ्याच ठिकाणी आले असल्याने त्यांच्याकडे अधिक चौकशी करून खातरजमा केली असता ते खोटं बोलत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.