"रिलेशन तोडले तर तुझ्यासह मुलाला मारून टाकेन..." डेटिंग ॲपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 12:14 PM2024-07-06T12:14:26+5:302024-07-06T12:14:54+5:30
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे...
पुणे : डेटिंग ॲपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून घटस्फोटित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला, तसेच रिलेशनशिप सुरू न ठेवल्यास महिलेला व तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार ३ डिसेंबर २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत वारंवार घडला आहे.
याबाबत ३५ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. ४) येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून नीलेशभाई पंजाभाई कलसरिया (३०, रा. फ्लॅट नं. ३९, कोणार्क कॅम्पस, विमाननगर) याच्यावर बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा घटस्फोट झाला असून, ती ११ वर्षांच्या मुलासोबत वानवडी परिसरात राहते. पीडिता एका कंपनीत कामाला असून, ती वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करते.
नोव्हेंबर २०२३ मध्ये आरोपी आणि महिलेची ओळख एका डेटिंग ॲपवरून झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना त्यांचे मोबाइल नंबर शेअर केले. चॅटिंग करत असताना एका दिवशी आरोपी महिलेला भेटण्यासाठी आला. त्याने अर्जुन असे नाव सांगितले होते. आरोपीने महिलेला लाँग ड्राइव्हवर जाऊ, असे सांगून मुंबई येथे घेऊन गेला. तिथून परत येताना महिलेला जबरदस्तीने बीअर पाजली. पुण्यात आल्यानंतर कल्याणीनगर भागातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर आरोपीने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, आरोपीचे इतर मुलींसोबत संबंध असल्याची माहिती महिलेला समजली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपीने महिलेला शिवीगाळ करून हाताने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. आरोपीने महिलेला फोन करून तू हे प्रकरण वाढवले तर मी तुला संपवून टाकेन, तसेच तुझ्या मुलालादेखील कायमचे संपवून टाकेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लामखेडे करत आहेत.