'इकडे आला तर खाशील मार, अप्परची पोर गुन्हेगार', आक्षेपार्ह रॅपसॉंग बनवणाऱ्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 10:02 IST2022-11-17T10:00:13+5:302022-11-17T10:02:40+5:30
इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या काही तरुणांना घेऊन त्याने डॉल्फिन चौकाजवळ अशा प्रकारचं रॅप सॉंग तयार केलं होतं

'इकडे आला तर खाशील मार, अप्परची पोर गुन्हेगार', आक्षेपार्ह रॅपसॉंग बनवणाऱ्या तरुणाला अटक
पुणे प्रतिनिधी/ किरण शिंदे : 'तुझ्या घरात नाही गहू, म्हणे एलसीडी घेऊ, तुझी जागीरदारी, हा तुझी भाईगिरी, इकडे आला तर खाशील मार, अप्परची पोर गुन्हेगार" अशा प्रकारचं गाणं तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतिक महबूब शेख (रा. काकडे वस्ती, गल्ली नंबर एक, अप्पर इंदिरानगर पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रदीप मधुकर गाडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ऋतिक शेख हा पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात राहतो. त्याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांना घेऊन त्याने डॉल्फिन चौकाजवळ अशा प्रकारचं रॅप सॉंग तयार केलं होतं. ''तु मेला मी घेऊन येईल हार, कारण माझा हूर मला देतोय आधार, तुझी नाही माझ्यासमोर लायकी, मी नी पायात घातली नाईकी, मी पोरगा जरा सनकी...'' त्यासोबतच काही अश्लील शब्द या व्हिडिओत त्याने वापरले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली. आणि आरोपी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलीस निरीक्षक हिवरकर या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास करत आहेत.