मनमानी कराल, तर तुमचा ‘भाटिया’ करू - सभागृहनेत्यांची प्रशासनाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 06:00 AM2017-09-26T06:00:18+5:302017-09-26T06:00:33+5:30
सभागृहात शंभर नगरसेवक नव्याने निवडून आले आहेत. त्यांचा जराही विचार करायला प्रशासन तयार नाही. त्यांच्या प्रभागातील आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षकांना त्यांना काहीही न सांगता बदल्या केल्या गेल्या
पुणे : सभागृहात शंभर नगरसेवक नव्याने निवडून आले आहेत. त्यांचा जराही विचार करायला प्रशासन तयार नाही. त्यांच्या प्रभागातील आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षकांना त्यांना काहीही न सांगता बदल्या केल्या गेल्या, त्यांनी नागरिकांची कामे करायची तरी कशी, असा संतप्त सवाल करीत अशी मनमानी करायला जाल तर तुमचा अरुण भाटिया करू, अशी तंबीच सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला महापालिकेच्या भर सभागृहात दिली.
गेल्या काही दिवसांत प्रशासनाने अनेक प्रभागांमधील आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी असलेले आहेत तसेच सहा किंवा वर्षभर असलेलेही आहेत. नगरसेवकांनी नुकतेच कुठे थेट प्रभागात तळापर्यंत काम करणाºया महापालिकेच्या या कर्मचाºयांशी जुळवून घेतले होते, तोच त्यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे प्रभागातील सार्वजनिक कामांवर परिणाम होऊ लागला.
त्यातूनच सोमवारी झालेल्या सभेच्या अखेरच्या टप्प्यात अनेक नगरसेवक प्रशासनावर या एका कारणामुळे तुटून पडले. साचत असलेल्या कचºयावरून चर्चा सुरू झाली व ती नंतर बदल्यांवर घसरली. सत्ताधाºयांबरोबर पदाधिकाºयांच्याही लक्षात सदस्यांच्या भावना आल्या व त्यांनी सर्वांनाच बोलण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सभागृहातील निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवकांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. त्यात विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना यांच्याबरोबरच सत्ताधारी भाजपाच्याही सदस्यांचा समावेश होता.
यात काही धोरण असल्याचेही दिसत नाही. फक्त सहा महिने झाले आहेत, त्यांच्याही बदल्या व तीन वर्षे झाले आहेत, त्यांच्याही बदल्या, तक्रारी आहेत त्यांच्याही व तक्रारी नाहीत त्यांच्याही, याला मनमानी म्हणायचे नाही तर काय, अशी टीका सदस्यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील खड्डेही वाढले आहेत. त्याच्या दुरुस्तीची व्यवस्था केलेली नाही. कचºयाच्या कुंड्या भरून वाहत आहेत. मात्र, त्या साफ केल्या जात नाहीत. नागरिक आमच्याकडे सातत्याने तक्रार करीत असल्याची तक्रार नगरसेकांनी केली.
- नगरसेवकांना विश्वासात न घेता बदल्या करण्यात आल्या, त्यामुळे कामात गोंधळ निर्माण झाला आहे, ठिकठिकाणी कचरा साचला आहे, सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी टीका नगरसेवकांनी केली.
- प्रभागातील अनेक ठिकाणांची ज्यांना माहिती असते, त्यांनाच बदली केल्यामुळे आता नव्याने आलेल्या कर्मचाºयाला प्रभाग माहिती कसा होणार, काम कधी असा सवाल केला.
- सभेचे कामकाज संपत आले होते. पदाधिकाºयांनी अगदी ठरवून ते लांबवले. बहुसंख्य सदस्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे कधी न बोलणाºयांनाही आजच्या सभेत तोंड उघडावे लागले. त्याचा परिणाम विषयावर झाला.
वेळ पडल्यास विरोधकांची मदत घेऊ
अशी मनमानी चालणार नाही, पदाधिकारी सदस्य अधिकाºयांना सन्मान देतात, याचा अर्थ त्यांना घाबरतात असा नाही. आम्ही २० पेक्षा जास्त वर्षे सभागृहात आहोत, अधिकाºयांना कसे गप्प करायचे ते माहिती आहे, वेळ पडली तर शिंदे, तुपे यांची मदत घेऊन तुमचा अरुण भाटिया करू, सरकारला हे अधिकारी आम्हाला नकोत, असे कळवताना आम्हाला काही वाटणार नाही, हे काम करू देत नाही हे सरकारला आम्ही कळवू, असा भडिमारच भिमाले यांनी प्रशासनावर केला. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र बदल्यांना जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर त्यांचा रोख होता.
- श्रीनाथ भिमाले , सभागृहनेते