चुकीचे काम केल्यास निलंबनाला सामोरे जावे लागेल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:46 IST2025-01-03T18:45:50+5:302025-01-03T18:46:22+5:30

खासगी रुग्णालयांची पाहणी करावी, त्रुटी आढळल्यास कारवाई करावी, आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश

If you do something wrong you will face suspension Health Minister Prakash Abitkar warns | चुकीचे काम केल्यास निलंबनाला सामोरे जावे लागेल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा इशारा

चुकीचे काम केल्यास निलंबनाला सामोरे जावे लागेल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा इशारा

पुणे : रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. परंतु काहींनी कामामध्ये निष्काळजीपणा करत आहेत. आरोग्य सेवा देताना हलगर्जीपणा करु नका. कारण कारवाई करताना कुणाची दया माया करणार नाही. मी आजपर्यंत निलंबनासाठी सगळ्यात जास्त आग्रह धरणारा आमदार आहे. त्यामुळे चुकीचे काम करु नका. तसे काही झाले तर निलंबनाला सामोरे जावा, असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

आरोग्य खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुण्यातील जिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालयाला शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, पुणे परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, येरवडा मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील उपस्थित होते.

येरवडा मनोरुग्णालयात रुग्णांना मिळणारी सुविधा कुचकामी असून येथील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते. तसेच ठेकेदारांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना निम्माच पगार देण्यात येतो. याशिवाय रुग्णालयातील स्वच्छतागृहे घाण आहेत. सौरऊर्जा पॅनेल बसवण्याचे काम अपूर्ण असल्याने रुग्णांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. परंतु कामाचे पूर्ण बिल मात्र कंत्राटदाराला दिले गेले. याला या ठिकाणी काम करणाऱ्या केंद्रचालक आणि अधिकारी जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. आणि कामकाजात सुधारणा करण्याचे सूचना देण्यात आले.

रुग्णसेवेला प्राधान्य द्या

कायद्यानुसार सर्व रुग्णालयांनी तपासण्यांचे, उपचारांचे दर दर्शनी भागात लावलेे पाहिजे. खासगी रुग्णालयांची पाहणी करावी, त्रुटी आढळल्यास कारवाई करावी. तसेच आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय येथे रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.

मनोरुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची काळजी घेणे, उपचार करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळत नसेल, तर संबंधित ठेकेदाराला नोटीस द्यावी. नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. – प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

Web Title: If you do something wrong you will face suspension Health Minister Prakash Abitkar warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.