तू माझ्या घरी आली नाहीस तर तुला शप्पथ आहे; मुलीवर अत्याचार, आरोपीला जन्मठेप
By नम्रता फडणीस | Published: December 5, 2023 03:11 PM2023-12-05T15:11:10+5:302023-12-05T15:11:43+5:30
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता त्यांनी आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली होती
पुणे: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणात ३७ वर्षीय आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा आदेश दिला. आरोपीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंडाची रक्कम पीडितेस देण्यात यावी तसेच ती न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.
विनायक शांतवन शिंदे (वय 37) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत, 16 वर्षीय मुलीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डिसेंबर 2013 मध्ये हा प्रकार घडला. पीडिता ही शाळेतून घरी जात असताना शिंदे याने तिचा पाठलाग करत पीडितेस तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्या घरी आली नाहीस तर तुला शप्पथ आहे असे सांगून घरी घेऊन गेला. त्यानंतर, तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. घरचे रागावतील या भीतीने पीडितेने याबाबतची माहिती तिच्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर, ही माहिती इंडिया स्पॉन्सरशिप संस्थेस कळविण्यात आली त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आईस संपर्क करत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणात, सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील संध्या काळे यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता त्यांनी आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.