अभयारण्यातच खायला मिळालं, तर थांबतील हल्ले! पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:42 PM2022-09-07T12:42:10+5:302022-09-07T12:42:32+5:30
बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज
पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांवर हल्ले करून त्यांना जखमी केले, तर एका तरुणाचा जीव घेतला आहे. त्यामुळे बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे. त्यासाठी कायमस्वरूपी पावले उचलणे आवश्यक आहे, तरच बिबट्यांचे हल्ले कमी होतील. त्यांच्या मूळ अधिवासात चिंकारा, हरीण, चितळ, काळवीट यांची प्रजोत्पादने वाढवली तर बिबट्यांना खाद्य मिळेल आणि साहजिकच ते मानवी वस्तीकडे येणार नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जुन्नर परिसर, भीमाशंकर अभयारण्य हे बिबट्याचे क्षेत्र मानले जाते. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणांहून बिबटे बाहेर पडत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते पोहोचले आहेत. पुण्याच्या वेशीपर्यंत येऊ लागले आहेत. त्यामुळे मानव-बिबट संघर्ष वाढला आहे. त्यात अनेकजण जखमी, तर काहींना आपला जीव गमवावा लागत आहेत. म्हणून यावर ठोस धोरण करणे अत्यावश्यक ठरले आहे. माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सातत्याने वन्यजीवांसाठी खास धोरण करायला हवे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावादेखील केला आहे. परंतु, अद्याप तरी सरकारकडून काहीच उपाययोजना होताना दिसून येत नाही. परिणामी बिबट-मानव संघर्ष वाढत आहे.
भीमाशंकर अभयारण्यात कमी आणि इतर भागात बिबट अधिक पाहायला मिळत आहेत. मुळात त्यांचे खाद्य चिंकारा, चितळ, हरीण, काळवीट यांची संख्या कमी झाली. त्यांचा अधिवास असलेला भाग कमी झाला. त्यामुळेच त्यांना अन्नासाठी इतरत्र भटकावे लागते. उसाच्या शेतीमुळे तर त्यांना राहण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मादी बिबट एकावेळी तीन-चार बछड्यांना जन्म देत आहे. उसाचे क्षेत्र त्यांच्या बछड्यांसाठी अतिशय सुरक्षित असते. परिणामी ते आता मूळ अधिवासात कमी आणि या उसाच्या शेतातच राहत आहेत.
प्रजोत्पादन केंद्रे हवीत
बिबट्यांसाठी खास चितळ, हरीण, काळवीट, चिंकारा या प्राण्यांची प्रजोत्पादन केंद्रे तयार केली पाहिजेत. त्यामुळे बिबट्यांना खायला मिळू शकते. जर त्यांच्या अधिवासात योग्य खाद्य मिळाले, तर ते बाहेर भटकंती करणार नाहीत, असा उपाय माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सातत्याने सांगितला आहे. सरकारने यावर योग्य निर्णय घ्यायला हवा.