ऐक्य झाल्यास प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारणार- रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:59 AM2018-04-20T01:59:28+5:302018-04-20T01:59:28+5:30
लोकसभेस रामटेक किंवा दक्षिण-मध्य मुंबई या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आठवले यांनी सांगितले.
पुणे : भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाच्या ऐक्यामध्ये काम करण्याची माझी तयारी आहे. मात्र, त्यासाठी ऐक्य झाले पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरूवारी व्यक्त केले.
लोकसभेस रामटेक किंवा दक्षिण-मध्य मुंबई या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ते म्हणाले, आंबेडकरी जनतेकडून आरपीआय गटाचे ऐक्य झाले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे.
आरपीआयचा २ मे रोजी मोर्चा
अॅट्रोसिटी कायद्यात बदल करू नये. त्याचप्रमाणे अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत डावलले जाते. त्यामुळे केंद्राने पदोन्नती आरक्षणासाठी कायदा तयार करावा. तसेच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी. संभाजी भिडे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यामुळे ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी आदी मागण्यांसाठी २ मे रोजी सर्व जिल्ह्यांत मोर्चा काढण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला, असेही आठवले यांनी सांगितले.