Be Positive: कोरोना झालाय मग 'No Tension' दुखणे अंगावर काढू नका अन् सात दिवसांत बरे व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:22 AM2022-01-18T11:22:34+5:302022-01-18T11:22:43+5:30
वेळेत निदान आणि योग्य उपचार यामुळे कोरोनाबाधितांना लवकर बरे वाटू शकते
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तो सात दिवसांत बरा होत आहे. गृह विलगीकरण कालावधीही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे आढळली तरी तातडीने चाचणी करणे गरजेचे आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार यामुळे कोरोनाबाधितांना लवकर बरे वाटू शकते. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णामध्ये सुरुवातीला ताप, खोकला, वास किंवा चव जाणे अशी सौम्य लक्षणे दिसत होती. पहिले चार दिवस उलटल्यानंतर ऑक्सिजन पातळी कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, फुप्फुसांमध्ये संसर्ग वाढणे असा त्रास वाढीस लागत होता. सुरुवातीला तीन-चार दिवस लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागत होते. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांमध्ये घसा खवखवणे, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा अशा स्वरूपाची सौम्य किंवा मध्यम लक्षणे पहायला मिळत आहेत. पाच-सात दिवसांमध्ये लक्षणे कमी होऊन सात दिवसांत रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. सध्या बहुतांश लक्षणे कोरोनाचीच दिसत असल्याने रुग्णांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार सुरू करावेत, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. कल्पना देसाई यांनी दिला आहे.
या औषधींचा केला जातोय वापर
''रुग्णांमधील लक्षणे पाहून औषधोपचार ठरवले जात आहेत. पॅरासिटॅमॉल, व्हिटॅमिन सी, मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्या ही औषधे सर्वसाधारणपणे वापरली जात असून त्याबरोबर लक्षणांप्रमाणे एक किंवा दोन औषधे समाविष्ट केली जात आहेत. मात्र, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा चिठ्ठीशिवाय घेणे म्हणजे आजारातील गुंतागुंत वाढवण्यासारखे आहे असे डॉ. अनिकेत देशपांडे यांनी सांगितले.''
विषाणू पोहोचतोय गळ्यापर्यंतच
सध्या ८० टक्के लोकांना ओमायक्रॉनची तर २० टक्के लोकांना डेल्टाची लागण होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग जास्त असला तरी हा विषाणू गळ्यापर्यंतच परिणामकारक ठरत आहे. फुप्फुसांमध्ये संसर्ग करण्याची विषाणूची ताकद कमी आहे.
ही लक्षणे दिसताच करा चाचणी
अंगदुखी, थकवा, गळून गेल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे, ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे तीन दिवसांहून अधिक काळ टिकल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी.
गर्दी टाळा, मास्क वापरा
''सध्या संसर्गाचे प्रमाण खूप वेगवान आणि जास्त आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये लगेचच लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे लसीकरण पूर्ण करून घेणे, गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे हे नियम सर्वांनी पाळणे आवश्यक आहे असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.''